नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स स्कूलमध्ये ‘बाल आनंद बाजार’ उत्साहात संपन्न

0

करमाळा(दि.१८): श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल आणि ट्विंकलिंग स्टार्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘बाल आनंद बाजार’ या विशेष उपक्रमाचे आयोजन गुरुवार, १७ मार्च रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम कै. श्री गिरधरदासजी देवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्यांच्या ढोल-ताशाच्या गजरात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश करे पाटील होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, श्रीमती सुनीता देवी,जयंत करे, श्री कटारिया, हनुमंत फंड, अ‍ॅड.सचिन हिरडे आणि श्री काझी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात कै. श्री गिरधरदास देवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पाहुण्यांचा सत्कार श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात श्री गणेश करे पाटील यांनी कार्यक्रमाचे महोत्सवात रूपांतर झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले.

रिबन कापून ‘बाल आनंद बाजार’चे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मुलांनी स्वतः विविध स्टॉल्स उभारले, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, भाजीपाला विक्री, खेळांचे स्टॉल्स यांचा समावेश होता. या निमित्ताने विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान, संघटनकौशल्य आणि सृजनशीलता विकसित होण्यास प्रोत्साहन मिळाले.

आनंदी बाजारात विविध वस्तूची विक्री करताना विद्यार्थी

या उपक्रमाला पालक वर्ग तसेच करमाळा शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती काळे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर आणि संस्थेच्या प्रमुख सुनिता देवी यांनी पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानत सर्वांचे अभिनंदन केले. या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!