अखेर केम स्थानकावर २ एक्स्प्रेस ला मिळाला थांबा – खासदारांच्या प्रयत्नांना आले यश
केम : ( प्रतिनिधी/संजय जाधव ) – केम रेल्वे स्टेशनवर फास्ट एक्स्प्रेसचा थांबा मिळविण्याची केमकरांची प्रलंबित असलेली मागणी अखेर पुर्ण झाली असून केम रेल्वे स्टेशनवर दादर-पंढरपूर-दादर एक्सप्रेस (ट्रेन नंबर ११०२७/११०२८) व मुंबई- हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस (ट्रेन नंबर २२७३१/२२७३२) या दोन गाड्यांना रेल्वे प्रशासनाने थांबा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वी केम रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या हैदराबाद – मुंबई एक्स्प्रेस, चेन्नई – मुंबई एक्सप्रेस, साईनगर-शिर्डी या सर्व रेल्वे गाड्यांचा केम रेल्वे स्थानकावर थांबा होता. लॉक डाऊन उठल्यानंतर सर्व रेल्वे गाड्या चालू झाल्या परंतु केम येथे एकही एक्स्प्रेस रेल्वे थांबत नव्हती. यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे थांबा नसल्याने गैरसोय झाली होती. केम येथील प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदने देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला होता. वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळा याविषयी बातम्या येऊन गेल्या होत्या.परंतु गाडीचे थांबे मिळविण्यात यश मिळत नव्हते.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काही महिन्यांपूर्वी केम दौऱ्यावर आले असताना तिथे रेल्वे थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केम ग्रामस्थांनी, व्यापारी वर्गाने केली होती. यानंतर खासदार नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केम रेल्वे थांबा मागणीचे निवेदन दिले होते. तरी देखील काही शर्थी- अटींमुळे रेल्वे विभाग थांबा मान्य करत नव्हता.याचा निषेध म्हणून खासदार नाईक निंबाळकर यांनी रेल्वे सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला होता.
अखेर रेल्वे मंत्रालयाने केम स्टेशनवर रेल्वे थांबा देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार दादर- पंढरपूर -दादर एक्सप्रेस आणि मुंबई- हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा मिळाला आहे.केमला स्टेशनवर एक्स्प्रेसला थांबा मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केम येथे दोन गाड्यानां थांबा मिळवून दिल्याबद्दल खासदार श्री.रणजित सिंह नाईक निंबाळकर व गणेश चिवटे यांचे केम येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह ओहोळ यांनी तसेच केम व्यापारी असोसिएशने आभार मानले.