डॉ .पाटील यांच्या निधनाने एक सहृदयी मित्र गमावला – माजी आमदार जयवंतराव जगताप
करमाळा (दि.४) : स्व. डॉ . प्रदीप कुमार जाधव -पाटील ,डॉ .संजय कोग्रेकर व मी वर्गमित्र , डॉ . पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच प्रचंड धक्का बसला व एक सहृदयी मित्र गमावल्याचे प्रकर्षाने जाणवले अशा संवेदना माजी आ जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केल्या.
याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ पाटील यांचे वडील बी एम पाटील सर (नाना)यांना माझे वडील देशभक्त नामदेवराव जगताप साहेब यांनी महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत घेतले होते .या सेवेतूनच पाटील सरांनी प्रपंचाचा गाडा हाकत मुला-मुलींची शिक्षणे ,विवाहादी जबाबदाऱ्या पार पाडल्या .डॉक्टर प्रदीप पाटील हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून रुग्णांचे सेवेसाठी सायकलवरून आसपासच्या खेड्यात फिरत असत त्यांचा तो काळ अतिशय संघर्षाचा होता याचे आम्ही ज्वलंत साक्षीदार आहोत.
वैद्यकीय क्षेत्रात नाव कमविल्यानंतर डॉक्टर प्रदीप पाटील यांनी राजकीय, सामाजिक जीवनात देखील आपला ठसा उमटवला व आदिनाथ चे अध्यक्ष पदाची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडली .त्यांच्या वैद्यकीय सेवेचा वारसा व परंपरा डॉ रोहन अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत आहे याचा डॉ प्रदीप पाटील यांना सार्थ अभिमान होता. डॉक्टर प्रदीप जाधव पाटील यांच्या अकाली निधनाने जाधव पाटील कुटुंबावर जो दुःखांचा डोंगर कोसळला आहे. यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना! अशा प्रकारची भावना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केली.
संबंधित बातमी – करमाळा येथील डॉ.प्रदिपकुमार जाधव-पाटील यांचे निधन..