श्रीराम मंदिरास, सकल मुस्लिम समाज व कलाम फाउंडेशनकडून फ्रीज भेट

करमाळा (दि.३) : करमाळा येथील एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन आणि करमाळा तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्य जोपासण्यासाठी प्रयत्न केले जातात. यात अजून एक भर घातली गेली आहे. या दोन्ही संघटनांच्या वतीने करमाळ्यामधील वेताळ पेठेतील श्रीराम मंदिरास पाण्याचा फ्रीज भेट देण्यात आला. यापूर्वी या संघटनांनी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले होते. यावेळी मंदिर परिसरात नव्याने घेण्यात आलेल्या बोअरवेलचे पूजनही करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने म्हणाले, “करमाळा तालुक्यातील धार्मिक ऐक्य प्रेरणादायक आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी काम केले, तिथेही असेच सौहार्द अनुभवले. शहरातील मुस्लिम समाजाने श्रीराम मंदिरासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”

ते पुढे म्हणाले, “दरवर्षी गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान जामा मशिदीतून पुष्पवृष्टी होते, नवरात्रोत्सवात कमलादेवी मंदिरात फराळ वाटप केले जाते, आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवा केली जाते, तसेच शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. हे सर्व कार्य सामाजिक सलोखा दृढ करणारे आहे.”
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के, अॅड. बाबुराव हिरडे, नेते सुनील सावंत, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी नगरसेवक अतुल फंड, दिव्य मराठीचे पत्रकार विशाल घोलप, पै दादा इंदलकर, राजाभाऊ वीर, धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. मंदिर समितीकडून विजय देशपांडे, महेश परदेशी, दर्शन कुलकर्णी आणि रुपेश वनारसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन पाहिले.
अब्दुल कलाम फाउंडेशन व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष समीर शेख, समाजाध्यक्ष जमीर सय्यद, जेष्ठ पत्रकार नासीर कबीर, नेते फारुख जमादार, अॅड. नईम काझी, डॉ. सादिक बागवान, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख, मुस्तकीम पठाण, उद्योजक जावेद सय्यद, साजिद बेग, इम्तियाज पठाण, कलीम शेख, जहाँगीर बेग, शाहीद बेग, अरबाज बेग, आलीम पठाण, कलंदर शेख, फिरोज बेग, आरिफ पठाण, आलीम शेख, यासीन सय्यद, शोएब बेग, जहाँगीर शेख, राजू नालबंद आदी मान्यवर उपस्थित होते.