घरतवाडी ग्रामस्थांचा प्रशासनावर बहिष्कार – डांबरीकरण रस्ता द्या – मुरूमीकरण निविदेस ग्रामस्थांचा विरोध..!
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : “घरतवाडी विकणे आहे ?” “शासकीय यंत्रणेवर बहिष्कार” अशा विविध प्रकारचे पोस्टर्स तयार करून घरतवाडी (ता.करमाळा) येथील युवकांनी एकत्र येऊन शासकीय यंत्रणेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, विविध गैरसोयीबाबतीत पोस्टर तयार करून या युवकांनी सोशल मीडियावर सध्या व्हायरल सुध्दा केलेले आहेत, ग्रामस्थांनी घरतवाडी गावास जोडणारे २ मुख्य कमकुवत रस्ते (घरतवाडी- कुंभारगाव व करपडी हद्द- कुंभारगाव) आजपर्यंत डांबरी करण न झालेमुळे गावातील स्थानिक नागरिक व युवकांनी एकत्रित येऊन शासकीय यंत्रणेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकदिलाने घेण्यात आलेला आहे. जो पर्यंत डांबर या दोन रस्त्यावर पडणार नाही तो पर्यंत बहिष्कार कायम राहणार असून, याबाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री, सोलापूर जिल्हा तसेच विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांना कळविले आहे.
यानंतर सावर्जनिक बांधकाम विभाग-२ मार्फत घरतवाडी ते कुंभारगाव येथील खराब झालेल्या रस्त्याच्या सुधारणा करणे कामी तुटपुंज्या खर्चाची निविदा प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून घरतवाडी ते कुंभारगाव ह्या रस्त्यास ७ लाख ३५ हजार रुपयाचे टेंडर दि.१ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये एखाद्या एजन्सी ला ते काम मिळवायचे असेल तर त्यांना स्पर्धात्मक पद्धतीने ४-५ लाखात हे काम संबधित एजन्सी ला मिळेल. त्यातूनही सदर एजन्सी त्याचे फायदे करिता हे काम २-३ लाखात गुंडाळून मोकळा होईल. या कामामध्ये सुधारणा करणे या शीर्षकाखाली काम उल्लेखित आहे. याच असे होईल येरे माझ्या माघल्या..जे मागे झाले तेच पुढे करायचे का ? असा सवाल या घरतवाडी येथील युवकांनी केला आहे.
घरतवाडी (ता.करमाळा) हे गाव करमाळा तालुक्यातील शेवटच्या टोकाला असल्याने या गावावर वारंवार अन्याय झालेला आहे, असे या युवकांचे म्हणणे आहे, या गावाला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा डांबरी रस्ता नाहीये त्यामुळे येथील नागरिकांची वाटचाल अत्यंत खडतर प्रवासातून होत आहे, या भागातील वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकी, चारचाकी वाहनचालक यांना या वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन सदर च्या कामाची सध्या प्रसिद्ध झालेली निविदा प्रक्रिया तातडीने थांबवावी, घरतवाडीतील नागरिकांचा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे वरील असणारा रोष वाढत चालेला असून कमी करण्यासाठी प्रशासनाने डांबरी करण करण्यास प्राधान्य द्यावे. याबाबतचे ग्रामस्थांचे सह्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग २ सोलापूर यांना दिले आहे.