अंधश्रद्धेच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने ‘अंधश्रद्धा मुक्त गाव’ अभियान राबवावे – प्रमोद झिंजाडे

करमाळा : राज्यातील ग्रामीण भागात वाढत्या अंधश्रद्धेच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘अंधश्रद्धा मुक्त गाव’ हे राज्यस्तरीय अभियान राबवावे, अशी मागणी करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात सविस्तर निवेदन पाठवून प्रत्येक ग्रामपंचायतीला आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अलीकडच्या काळात बुवाबाजी, तथाकथित चमत्कार आणि अघोरी प्रथांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची आर्थिक लूट तसेच महिलांचे शोषण वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने एक परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतींना अंधश्रद्धेविरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी विविध निर्देश द्यावेत.

याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘अंधश्रद्धा मुक्त गाव’ विषयावर ग्रामसभेत ठराव मंजूर करावा, गावपातळीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करावी, जिल्हा व तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम देखरेखीसाठी राबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. हे अभियान राबविल्यास अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये घट होऊन महिलांवरील शोषण कमी होईल आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल, असा विश्वास श्री. झिंजाडे यांनी व्यक्त केला आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्य मानवाधिकार आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

