हुंड्यासाठी विवाहितेचा छळ- सासरच्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल -

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ- सासरच्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा , ता.५:  पिंपळवाडी येथील एका विवाहित महिलेला हुंड्यासाठी छळ करून मारहाण करत घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती, सासू-सासरे आणि नणंदांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेश्मा हसेन शेख रा. (हिवरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह दि. २ एप्रिल २०१५ रोजी हसेन सज्जन शेख यांच्याशी झाला होता. या दाम्पत्यास एक मुलगी (शाहिस्ता) व एक मुलगा (सादिक) अशी दोन अपत्ये आहेत.

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, विवाहानंतर काही वर्षे सासरी समाधानाने संसार सुरू होता. मात्र त्यानंतर पती व त्याच्या कुटुंबीयांनी मानपान, हुंडा व इतर कारणांवरून तिचा छळ सुरू केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, उपाशी ठेवणे, घराबाहेर हाकलून देणे, तसेच माहेरच्या व्यक्तींना भेटण्यास मज्जाव करणे, अशा प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता.तसेच “हाळगाव येथे प्लॉट घेण्यासाठी माहेरकडून दहा लाख रुपये आणावेत” अशी मागणी करून सतत दमदाटी केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पती व सासऱ्यांनी मारहाण करून फिर्यादी महिलेला तिच्या दोन लहान मुलांसह घराबाहेर काढण्यात आले  आहे. त्यानंतर ती आपल्या माहेरी राहत असताना दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पतीने माहेरी येऊन दोन्ही मुलांना जबरदस्तीने हिसकावून नेले. यावेळी “तुला तलाक देणार असून दुसरे लग्न करणार” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पती हसेन सज्जन शेख, सासू महिमुना शेख, सासरे सज्जन ताजोद्दीन शेख तसेच नणंदांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!