भोसे येथे विवाहितेचा हुंड्यासाठी छळ – सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.२९: भोसे गावात विवाहित महिलेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा गुन्हा करमाळा पोलीसांत दाखल झाला आहे.

याबाबत साक्षी शुभम जाधव रा. भोसे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यात तीने म्हटले की, माझा विवाह २२ एप्रिल २०२४ रोजी शुभम बाळासाहेब जाधव यांच्याशी झाला होता. विवाहाचा सर्व खर्च तसेच सासरच्या लोकांचा मानपान माझे आई-वडिलांनी केला होता.
विवाहानंतर सुरुवातीचे दोन ते तीन महिने सासरच्यांनी नीट वागणूक दिली. मात्र त्यानंतर पती, सासू, सासरे तसेच नणंद व दिर यांनी घरगुती कारणांवरून शिवीगाळ, उपाशी ठेवणे, मारहाण करणे व हुंड्याच्या पैशांची मागणी सुरू केली.

“तुझ्या घरच्यांनी आम्हाला पैसे दिले नाहीत, त्यामुळे तुला सून म्हणून स्वीकारणार नाही,” असे म्हणत ९ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तसेच, पैसे दिले नाहीत तर घरातून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली. दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पती व सासरच्या मंडळींनी एकत्र येऊन मला मारहाण करून माझे माहेरी सोडून दिले.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


