करमाळा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे.. - Saptahik Sandesh

करमाळा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जिद्द व प्रयत्नाच्या जोरावर मी सामान्य स्थितीतून उभा राहिलेलो आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात कशी करायची व यश कसे मिळवायचे; याचा माझा अभ्यास झालेला आहे. याच माध्यमातून करमाळा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले.

आपल्या ७ मार्च रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त चिवटे हे सा. संदेशशी बोलत होते. पुढे बोलताना श्री. चिवटे म्हणाले, की माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक मनोहर चिवटे हे करमाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते. आमच्या परिवारात पूर्वीपासून राजकारण व समाजकारण हे विषय कृतीशील आहेत. शहरवासियांच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून लढत आहे. सामाजिक कार्य, सामाजिक मोर्चे, मेळावे तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न सोडवले आहेत. सर्वसामान्य व्यक्तींना सहकार्य करण्याच्या भुमिकेतून सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही कार्य गतिमान करण्यासाठी राजकीय शक्ती आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही संधी समजून मी लोकांचे प्रश्न सोडवणार आहे.

करमाळा तालुक्याच्या विकासासाठी करमाळा शहरवासियांना जास्तीत जास्त सुविधा व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटीबध्द राहणार आहे. सामाजिक व राजकीय वाटचालीचा आढावा देताना महेश चिवटे म्हणाले, की मी ऊस उत्पादकांना जास्त भाव मिळावा; या दृष्टीने केलेल्या आंदोलनातून कोट्यावधी रूपये सभासदांना मिळाले आहेत.

माझे वडील नरसिंह चिवटे यांचा पेपर व खते, बी-बियाणे विक्रीचा व्यवसाय होता. प्रत्यक्षात फारसे उत्पन्न नसल्याने श्री. चिवटे यांना लहानपणी रसवंतीगृहात काम करावे लागले. पतंग विकूनही त्यांनी शिक्षणाचा खर्च भागवला. पुढे वडिलांच्या व्यवसायात त्यांनी लक्ष घालून व्यवसाय जोरदारपणे चालवला व त्यातूनच उत्पन्न वाढवून दोन बहिणींचे लग्न, भावाचे शिक्षण व व्यवसायात वाढ केली. हे करत असतानाच ‘विश्व समाचार’ वृत्तपत्रात पत्रकारितेची सुरूवात केली. त्यानंतर दै. संचार, दै. सामना, दै. पुण्यनगरी मध्ये पत्रकार व साप्ताहिक बनशंकरी समाचार चे संपादक म्हणून काम केले. राशीनपेठ तरूण मंडळाच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊन वेगवेगळे उपक्रम राबविले. त्या दरम्यान माजी मंत्री स्व. दिगंबररावजी बागल मामा यांच्यासोबत नऊ वर्षे तसेच माजी आमदार शामलताई बागल यांचे समवेतही पाच वर्षे राजकीय कामकाज केले.

मिळालेली पदे…अध्यक्ष करमाळा तालुका पत्रकार संघ • चेअरमन श्री कमलादेवी औद्योगिक वसाहत • सचिव – माँसाहेब नागरी सहकारी पतसंस्था • चेअरमन – अमरनाथ मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्ट • चेअरमन – मुक्ताई गारमेंट प्रकल्प • माजी संचालक श्री मकाई सह. साखर कारखाना • कार्यकारी संचालक बनशंकरी ॲग्री टेक प्रा. लि. फॉर्म महेश ॲग्रो एजन्सी करमाळा. • सहसचिव – महाराष्ट्र राज्य खते आणि किटकनाशक संघटना • सचिव – महाराष्ट्र युवा आघाडी पुणे • जिल्हा प्रमुख – शिवसेना करमाळा. • विशेष कार्यकारी दंडाधिकारी (२०१२-२०१७ )

प्रस्तावित…स्वातंत्र्यसैनिक कै.मनोहरपंच चिवटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, कमलाभवानी बल्ड बँक, डायलिसिस सेंटर या माध्यमातून अनेक रुग्णांना सहकार्य होणार आहे.

करमाळा तालुक्यातील रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून जवळपास ७० जणांना लक्षावधीची मदत मिळवून दिली आहे. अमरनाथ दूध प्रकल्पातून ५० युवकांना काम, मुक्ताई गारमेंट मधून ३० ते ४० जणांना काम, शासकीय कार्यालयातून आडवणूक होणाऱ्या बाबींमध्ये सातत्याने पत्रकारितेतून आवाज उठवून आंदोलन करून अनेकांना न्याय मिळवून दिला. तसेच श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून उद्योजकांना सहकार्य, मॉसाहेब पतसंस्थेतून उद्योजकांना मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!