तिकिट दरात वाढ केलीत तर सुविधाही तशाच द्या! – एसटी दरवाढीवर संतप्त प्रतिक्रिया
करमाळा(दि.२९) : प्रचंड महागाईच्या काळात सर्वसामांन्याना प्रवासासाठी एसटीचा आधार असतो परंतु २४ जानेवारी पासून एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला असून तब्बल १४.९७% एसटी तिकीट दरामध्ये भाडेवाढ करण्यात आली. या भाडेवाढीचा मोठा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. या भाडेवाढीवर आता प्रवासी संघटनेकडून व नागरिकांकडून नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ही भाडेवाढ मागे घ्यावी असे देखील त्यांचे म्हणणे आहे.
याविषयी प्रवासी संघटनेचे सदस्य प्रवीण अवचर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “एकीकडे प्रवास भाड्यात भरमसाठ वाढ केलेली असताना दुसरीकडे मात्र एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था अतिशय दयनीय व बिकट झालेली असून तुटक्या फुटक्या बस मधून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे . एसटी महामंडळ प्रवाशांकडून वाढीव पैसे वसुल करत आहे तर त्यांना तशा सुविधाही त्या प्रमाणात का देत नाहीत हा प्रश्न आज प्रत्येक प्रवाशाला पडलेला आहे. कारण दैनंदिन एसटी महामंडळाच्या बसेस बंद पडणे तुटलेल्या काचा तुटलेल्या खिडक्या खिळखिळ्या झालेल्या बसेस या लांब पल्ल्याच्या प्रवासाला विविध राज्याच्या आगारातून सोडल्या जातात. सर्वसामान्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना अशा नादुरुस्त आणि तुटक्या फुटक्या बस मधून जीव मुठित धरून प्रवास करावा लागतो आहे .’प्रवासी आमचे दैवत’ हे ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुख सुविधांकडे सुद्धा लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तरी वाढत्या तिकीट दराप्रमाणेच प्रवाशांना एसटी महामंडळांकडून चांगल्या सुस्थितीत आरामदायी बसेसची व्यवस्था करून द्यावी!” असे ते म्हणाले.
संभाजी बागल म्हणाले की, प्रवासात एसटी बसेस या महामंडळाने ठरवून दिलेल्या अधिकृत हॉटेल वरती जेवणासाठी नाश्त्यासाठी थांबवतात परंतु त्या हॉटेल्स मधून प्रवाशांकडून दाम दुप्पट दर घेतला जातो. एवढेच काही तर येथील जेवणाची नाश्त्याची क्वालिटी ही अतिशय निकृष्ट पद्धतीचे असते. प्रवाशांना व्यवस्थित सुविधा दिल्या जात नाही. अशा दाम दुपटीने प्रवाशांकडून रक्कम वसूल करणाऱ्या हॉटेल्स वरती एसटी महामंडळांकडून योग्य ती कारवाई करायला हवी.
गेले अनेक वर्षे एसटीचे तिकीट हे राऊंड फिगर मध्ये होते त्यामुळे कंडक्टरला पैसे परत करताना जास्त अडचण येत नव्हती परंतु आता तिकिटाचे दर हे राऊंड फिगर मध्ये नसल्यामुळे सुट्टे द्यायला अडचण येत असून कंडक्टर बरोबर प्रवासी वाद घालत असल्याचे समोर येत असल्याचे कंडक्टर सांगतात.