सातवीतील विद्यार्थ्यांने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत केली आत्महत्या

केम(संजय जाधव): माढा तालुक्यातील आढेगाव येथे सातवीत शिक्षण घेणार्या १४ वर्षीय मुलाने अज्ञात कारणाने डोक्यात रिव्हॉल्व्हरमधून स्वतः वर गोळी झाडून घरी आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीधर गणेश नष्टे असे मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीधर हा सराटी (ता. इंदापूर) येथील जिजामाता प्रशालेमध्ये सातवीत शिक्षण घेत होता. घटनेदिवशी तो आजारी असल्याने घरीच होता. त्यास दवाखान्यात तपासणी करून आणले होते. डॉक्टरने त्यास विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याने अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
डोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवणाऱ्या मुलाचे वडील गणेश नष्टे हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांचीच ही बंदूक आहे. या बंदुकीचं लायन्सस असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडे असते. सोमवारी त्याने आपल्या वडिलांची बंदूक घेतली. शांतपणे खुर्चीवर बसला आणि काही कळायच्या आतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे.
गोळीबाराचा आवाज एकून घरातील आई, आजोबा व इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तो आई, लहान भाऊ, आजी, आजोबा यांच्यासमवेत राहत होता. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करीत आहेत.







