घरात शिवबा जन्मावा असे वाटत असेलतर आईने जिजाऊ बनले पाहिजे – शितलताई वाघमारे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : प्रत्येकाला आपला मुलगा शिवबा व्हावे असे वाटते, पण शिवबा ज्या घरातील आई जिजाऊ बनते, त्याच घरात शिवबा जन्माला येतो ही गोष्ट विसरून चालत नाही. त्यामुळे प्रत्येक आईने राष्ट्रमाता जिजाऊचा आदर्श घेऊन आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन येथील नोबेल इंग्लीश स्कुलच्या शिक्षिका शितलताई वाघमारे यांनी केले.
ज्ञानज्योती महिला ग्रुप व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत शिवणकाम प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शनाच्या कार्यक्रमात सौ. वाघमारे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यीका अंजली श्रीवास्तव या होत्या. यावेळी डॉ.कविता कांबळे, माधुरीताई परदेशी, नोबेल स्कुलच्या संस्थापिका एलिझाबेथ आसादे, मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.वाघमारे म्हणाल्या, की मुलींनी आता स्वत: संघर्ष करून आपले जीवन घडविले पाहिजे. कोणावरही अवलंबून न राहता सावित्रीबाईंनी जे शिक्षण दिले त्याचा पुरेपूर वापर करून आपले करियर बनवले पाहिजे.; असे आवाहन केले.
यावेळी डॉ.कविता कांबळे, गणेश करे-पाटील, ॲड.डॉ.बाबूराव हिरडे, सौ. श्रीवास्तव यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे आयोजन सौ. अनिता राऊत व सौ. निशिगंधा शेंडे यांनी केले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. यावेळी बालविद्यार्थीनी यांचीही भाषणे झाली.