जेऊरवाडी येथे चोरी – महिलेच्या कानातील सोन्याच्या बुगड्या कापून नेल्या..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जेऊरवाडी येथे १० नोव्हेंबरच्या पहाटे चोरट्यांनी घरात घुसून वृध्द महिलेच्या गळ्यातील १६ हजार रूपये किंमतीचे सोन्याच्या बुगड्या कापून घेतले आहेत. या प्रकरणी शिवाजी अंकुश शिरसकर (रा. शिरसकर वस्ती जेऊरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की १० नोव्हेंबरला पहाटे तीनच्या दरम्यान माझ्या वडिलांचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. माझा मुलगा संकेत याने भिंतीवरून पाहिले असता, तीन-चार अज्ञात लोक वडीलांना लाकडाने मारत होते. तरीही वडीलांनी त्यांना प्रतिकार करून दरवाजाची कडी उघडली.

आम्ही बाहेर आल्यानंतर चोरटे पळाले. तत्पूर्वी त्यांनी घरातील सामान इतरत्र टाकून माझी आई शकुंतला हिच्या कानातील १६ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बुगड्या बळजबरीने कापून नेल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.


