३० ग्रामपंचायत निवडणुकीत ३९२ जण सदस्य पदासाठी तर ३७ जण सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उभे..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून त्यापैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये लिंबेवाडी व वंजारवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील अंजनडोह येथे सरपंच पद बिनविरोध निवडून आले असून सदस्य पदाच्या एका जागेसाठी निवडणूक लागली आहे.
तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या २४४ ग्रामपंचायत सदस्य व ३० सरपंच पदासाठी ९० प्रभागात निवडणूक लागली आहे. यासाठी ३९२ जण सदस्य पदासाठी तर ३७ जण सरपंच पदासाठी निवडणुक रिंगणात उभे आहेत. आज (ता. ७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक नियंत्रण अधिकारी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव हे सकाळपासूनच पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील आ. संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गट यांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये या लढती होणार आहेत. आज दिवसभर तहसील कचेरी आवारासमोर तालुक्यातील नागरीक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.