‘मिशन विकसित गाव’ अभियानात करमाळा तालुक्यातील ६ गावांचा समावेश

करमाळा(दि.१ मे) : सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन विकसित गाव’ ही संकल्पना आकार घेत आहे. जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने हे अभियान राबविण्यात येणार आहे. करमाळा तालुक्यातील रावगाव, लिंबेवाडी, कोर्टी, कुंभारगाव, फिसरे आणि सरपडोह या सहा गावांचा या अभियानात समावेश करण्यात आलेला असून प्रत्यक्षात या कामाचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.


या उपक्रमाची मूळ प्रेरणा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झाली आहे. निवडलेल्या गावांमध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या सहकार्याने क्षेत्रभेटी, सर्वेक्षण, ग्रामस्थांना समुपदेशन अशा उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच जलसंधारण, आरोग्य व शिक्षण सुविधा, सेंद्रिय शेती व फळबाग लागवड, जलतारा प्रकल्प, पानंद रस्ते, फळ प्रक्रिया उद्योग, युवकांना रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन, तंटामुक्ती, गुन्हेगारीमुक्ती आणि व्यसनमुक्ती अशा विविध घटकांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधत या गावांचा शाश्वत विकास साधण्याचा मानस आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, बीट हवालदार, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच-उपसरपंच, शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, कृषी सेवक, महिला बचत गट, फार्मर क्लबमधील सदस्य आणि ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग या अभियानाचे बळ आहे.

अभियानाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात
या अभियानात समन्वयक म्हणून काम करणारे करमाळा येथील प्रा. लक्ष्मण राख या योजनेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, या योजनेच्या सुरवातीच्या टप्प्यात तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांकडून गावागावात जाऊन वेगवेगळ्या विषयांवर सर्व्हे केला जाणार आहे. यामध्ये शेतकरी, महिला, आदी वेगवेगळ्या घटकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एक रिपोर्ट बनवण्यात येणार आहे. हा रिपोर्ट सदर ग्रामपंचायतींना सादर केला जाणार आहे. या रिपोर्ट वरून शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधत गावांचा शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
करमाळा तालुक्यातील रावगाव, लिंबेवाडी, कोर्टी, कुंभारगाव, फिसरे आणि सरपडोह या सहा गावांमध्ये २६ एप्रिल पासून या सर्व्हेक्षणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. एक महिनाभर हे काम सुरू राहणार आहे. एम एस डब्ल्यू या कोर्सच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारे 41 विद्यार्थी सर्व्हे करत आहेत. यात विविध राज्यातुन आलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या एक महिन्यात विविध विषयातील तज्ञ व्यक्ती येऊन गावात मार्गदर्शन देखील करणार असल्याचे श्री.राख यांनी सांगितले.


या अभियानास टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूरचे कॅम्पस संचालक बाळ राक्षसे, फिल्ड वर्क समन्वयक गणेश चादरे, ग्रामविकास व कृषीतज्ज्ञ श्री गुरु भांगे (माढा), आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा) यांचे सहकार्य लाभणार आहे.


