करमाळ्यात नवीन भाजी मंडई व व्यापारी संकुलाचे आज लोकार्पण

करमाळा(दि.५): करमाळा येथील जुना बायपासजवळ नगरपरिषदेकडून उभारण्यात आलेल्या नवीन भाजी मंडई व व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा आज सोमवार, दि.५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. या संकुलाला ‘मा.आ.श्री. जयवंतराव नामदेवरावजी जगताप’ असे नाव देण्यात आले आहे. लोकार्पण सोहळ्यासह याच ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपणाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

या नवीन भाजी मंडई व व्यापारी संकुलाचे उद्घाटन माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायण पाटील असतील. माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे स्वागताध्यक्ष म्हणून तर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, तसेच मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

सदर भाजी मंडई बांधून अनेक महिने उलटून गेले असतानाही मंडई सुरू होण्यास विलंब झाला होता. दरम्यान देवीचामाळ रोड परिसरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी तात्पुरत्या शेडमधून विक्री सुरू ठेवली होती. काही नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक विभाग व नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना नोटिसा बजावून नवीन मंडईमध्ये स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी, नगरपालिकेने मंडई सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याच पार्श्वभूमीवर हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


“सध्या या नवीन मंडईत मुख्यतः देवीचामाळ रोडसह इतर ठिकाणचे भाजी विक्रेते स्थलांतरित होणार आहेत. मात्र, मुख्य बाजारपेठेतील मंडईचे स्थलांतर होणार की नाही, याबाबत नगरपालिकेने अजून निर्णय घेतला नसल्याचे समजते.”

या ठिकाणी व्यापारी संकुल देखील बांधले असून अनेकांनी येथे गाळे भाड्याने घेऊन लाखो रुपये गुंतवणूक करून व्यवसाय देखील सुरू केला होता. परंतु मंडई कधी सुरू होणार याकडे या व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले होते. आज अधिकृतपणे मंडई सुरू होत असल्याने या व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.


