९७ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी देवळालीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.५): देवळाली ग्रामपंचायतीतील ९७ लाख ३८ हजार ९०८ रुपयांच्या अपहार प्रकरणी अखेर तत्कालीन सरपंचांसह ग्रामविकास अधिकाऱ्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार २४ डिसेंबर २०१२ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत झाला होता. करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या ५२ तासांच्या आमरण उपोषणानंतर ही कारवाई झाली आहे.

या प्रकरणात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अंगद सुखदेव लटके (रा. अंजनगाव खेलोबा, ता. माढा) आणि तत्कालीन सरपंच प्रेमा अर्जुन जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश दिनकर थोरात यांनी पोलिसात फिर्याद दिली.

ननवरे यांनी यापूर्वीच या अपहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशीत अंगद लटके आणि श्रीमती बी. पी. गाटे यांच्यावर कारवाईची शिफारस झाली होती. मात्र, सहायक आयुक्तांनी गाटे यांना दोषमुक्त केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंगद लटके यांच्याकडून अपहाराची संपूर्ण रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळे ननवरे यांनी महाराष्ट्र दिनी सोलापूर येथे उपोषण सुरू केले आणि अखेर त्यांच्या ५२ तासांच्या आंदोलनानंतर कारवाई झाली.

काय आहेत आरोप?
सदर कालावधीमध्ये देवळाली ग्रामपंचायतमधील दरपत्रकाशिवाय साहित्य खरेदी करणे, पाणीपुरवठा साहित्य प्रमाणकाशिवाय व जाहीर प्रसिद्धीकरणाशिवाय खरेदी करून खर्च करणे, ग्रामनिधी मूल्यांकनसह विविध प्रक्रिया न राबवता खर्च करणे, लेखसंहिता भंग करणे, कर्तव्ये पार पाडण्यास कसूर करणे, जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक १९६७ मध्ये नियम भंग करणे, असे आरोप केले होते.



