करमाळा पंचायत समितीच्यावतीने 17 केंद्रामध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन – 1489 विद्यार्थ्यांचे 978 प्रयोग सादर..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२२) : करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या ‘सायन्स वॉल’ या उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्ताने थोर गणिती शात्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृतीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पंचायत समितीच्यावतीने या गटाकडील 17 केंद्रामध्ये आज (ता.२२) भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन करमाळा तालुक्यातील मान्यवर अधिकारी, पदाधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी या प्रदर्शनात 1489 विद्यार्थ्यानी 978 प्रयोग व विविध मॉडेल्स तयार करून त्याचे सादरीकरण केले. यामध्ये सहभागी 1278 विद्यार्थी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तर 211 विदयार्थी हे खाजगी माध्यमिक शाळेतील होते.
यामध्ये गांडूळ खत निर्मिती,सिंचनाचे विविध प्रकार,जलविद्युत निर्मिती,पवनचक्की ऊर्जानिर्मिती,विविध कृषीविषयक नाविन्यपूर्ण औजारे,विविध भौगिलीक परिस्थिनुसार असलेल्या घरांची रचना याबाबतचे मॉडेल्स,प्रदूषण कमी करण्याचे उपाय, रसायन शास्त्रातील विविध प्रयोग, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, विविध प्रकारच्या वायूंच्या माहितीचे प्रयोग तसेच वयोगटानुसार सोपे प्रयोगाचे सादरीकरण केले
आज झालेल्या विज्ञान प्रदर्शनातून 1 ली ते 5 वी व 6 वी ते 8 वी या गटनिहाय प्रत्येक केंद्रातून उत्कृष्ठ सादरीकरणाचे प्रत्येकी 1 ते 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थी यांचा तालुका स्तरावर गुणगौरव करण्यात येणार आहे.
विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी या गटातील केंद्रप्रमुख यांनी सुयोग्य नियोजन करून हे प्रदर्शन यशस्वी केले.तसेच या प्रदर्शनासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांनी दिली.