करमाळा पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान १२ बैलांची सुटका

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.९ : करमाळा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या दक्षतेमुळे मध्यरात्री जनावरांच्या अवैध तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली असून १२ जनावरे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक मयुर नागेश कदम हे ५ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजल्यापासून ते ६ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजेपर्यंत करमाळा शहरातील जामखेड चौक येथे नाकाबंदी ड्युटीवर होते. त्यांच्यासोबत पोहेकॉ. हिंगमिरे आणि पोलीस कॉ. कांबळे हेही उपस्थित होते.
नाकाबंदी दरम्यान पहाटे सुमारे १.४५ वाजता जामखेड रोडकडून येणारा आयशर कंपनीचा तपकिरी रंगाचा टेम्पो (MH-03 EG 4052) दिसला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यावर टेम्पो थांबवण्यात आला. चौकशीअंती वाहनचालकाने आपले नाव शकील अहमद शेख (वय ४३, रा. कुर्ला, मुंबई) असे सांगितले, तर त्याच्यासोबत असलेला इसम जमीर मुस्तफा कुरेशी (वय ३६, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) असा होता.

पोलीस आणि पंचासमक्ष टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये ७ खिलार व ५ जर्सी जातीचे बैल दाटीवाटीने बांधून ठेवलेले आढळले. या जनावरांना पाणी, चारा व औषधांची कोणतीही सोय न करता कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीअंती सदर जनावरे ही जमीर मुस्तफा कुरेशी यांची मालकीची असल्याचे समोर आले.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करून घेऊन संबंधितांविरुद्ध प्राणीसंवर्धन व संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



