गोविंदपर्व व प्रा.झोळ यांचा काहीही संबंध नाही – लालासाहेब जगताप

करमाळा (दि.५) – ‘गोविंदपर्व’ गुळ कारखाना राजुरी, येथील शेतकरी थकीत ऊस बिलाचा व प्रा. रामदास झोळसर यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसुन, आम्ही येत्या दीड महिन्यात बिल देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे गोविंदपर्व कारखान्याचे संचालक श्री. लालासाहेब जगताप यांनी काल ४ सप्टेंबर रोजी करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पुढे बोलताना श्री. जगताप म्हणाले की, गोविंदपर्व गुळ कारखाना हा शेतकरी हितासाठी राजुरी येथे सुरू करण्यात आला होता. यामध्ये कारखाना सुरळीतपणे चालवण्यासाठी जावई प्रा. रामदास झोळ सर आणि कन्या सौ मायाताई झोळ मॅडम यांनी वेळोवेळी सहकार्य करण्याचे काम केले. गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये ऊसाचे प्रमाण कमी असल्याकारणाने सदर गळीत हंगामात फक्त २३३४८ टन गाळप झाले होते. त्यातील काहींचे रुपये २०००/- प्रमाणे बिले अदा केलेली आहेत तर कांहीं शेतक-यांचे रुपये १५००/- प्रमाणे बिले अदा केलेली आहेत. उर्वरित ५००/- रुपये प्रमाणे सुमारे ८० ते ९० लाख रक्कम देणे बाकी आहे. तसेच कारखान्याची वाहतूकदार वाहन मालकाकडून उचल येणे बाकी आहे. आमची बँकेकडे सध्या ५० एकर जमीन तारण आहे. त्यातील स्वमालकीची काही जमीन विक्री करून आम्ही रक्कम देणार आहे. बॅकेचे आमचे सेटलमेंट झालेले असून आम्ही लवकरच बिल देणार आहोत. केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय रंग आणण्याचे काहींचे प्रयत्न चालू आहे. कारखाना तोट्यात असल्याने बंद आहे, बॅकेचे सेटलमेंट करून शेतकऱ्यांना आम्ही बिल देणार आहोत.

आम्ही सर्व शेतकऱ्यांना एक हप्ता दिलेला आहे. तसेच वेळोवेळी ज्या शेतकऱ्याने मुलांच्या शिक्षणासाठी किंवा काही अडचणीच्या वेळी थेट माझ्याशी संपर्क साधला त्यांची काही बिल मी स्वतः अदा केलेली आहेत. वरील राहिलेले पैसे किरकोळ असुन स्वतःच्या मालकीची काही एकर जमीन विकुन बिल देणार आहोत. शेतकऱ्यांऐवजी काही वेगळ्या गोष्टीत स्वारस्य असणाऱ्या व्यक्तींना ऐन विधानसभेच्या वेळेस शेतकऱ्यांच्या बिलाची आठवण झाली आहे. प्रा. रामदास झोळ सर यांचा याच्याशी कसलाही संबंध नाही. आम्हाला शेतकऱ्याचे पैसे बुडवायचे नाहीत. आतापर्यंत एकाही व्यक्तींने आमच्याकडे तक्रार केलेली नाही. केवळ विधानसभेला प्रा. रामदास झोळ सर निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वैमनस्याच्या भुमिकेतुन व केवळ ते आमचे जावई असल्याने विनाकारण त्यांना यात ओढण्याचा प्रयत्न काही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्या हस्तकामार्फत चालू आहे. केवळ ८० ते ९० लाख रुपये देणे आहे. करमाळा तालुक्यातील राजुरी येथील गोविंदपर्व कारखाना उर्वरित असणारे बिल दिड महिन्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय प्रकरण आहे?

गोविंदपर्व ऍग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना करमाळा तालुक्यातील राजुरी येथे डिसेंबर २००९ मध्ये स्थापन केलेला आहे. चंद्रशेखर जगताप हे या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष असून लालासाहेब जगताप हे या कारखान्याचे संचालक आहेत. या कारखान्यात मुख्यतः सेंद्रिय गुळ, गूळ पावडर आदी प्रोडक्स्ट्स तयार केले जात होते. तालुक्यातील विविध गावातुन शेतकरी इतर कारखान्याला पर्याय म्हणून या कारखान्याला ऊस घालत होते. पुढे व्यवस्थापनातील चुकांमुळे हा कारखाना आर्थिक अडचणीत आला. २०१८-१९ च्या हंगामानंतर कारखाना बंद पडला. यावेळी कारखान्याकडून अनेक शेतकऱ्यांची देणी बाकी होती. त्यातच हा कारखाना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २०२३ मध्ये लिक्विडिशनमध्ये काढलेला आहे.

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी संचालक म्हणून या कारखान्याचे काम पाहिले असून कारखान्याच्या दुरवस्थेस ते देखील जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. याबाबत प्रा. झोळ यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही परंतु लालासाहेब जगताप यांनी प्रा. झोळ यांचा या कारखान्याशी काहीही संबंध नसून ते विधानसभेची तयारी करत असल्याने त्यांना अडचणीत आणण्यासाठी हा आरोप करत असल्याचे त्यांनी काल (दि.४) करमाळा येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!