स्वच्छता विभागाच्या ठेकेदाराचे १० लाख रुपयांचे डिपॉझिट जप्त करण्यात यावे – महेश चिवटे

करमाळा (दि.८): करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या ५३ कामगारांचे मागील तीन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार थकवण्यात आले आहेत. या सर्व कामगारांचे थकलेले पगार त्वरित देण्यात यावेत तसेच नगरपालिकेकडून ठेकेदाराला प्रत्येक कामगारामागे दिला जाणारा पगार व प्रत्यक्षात कामगारांना दिला जाणार पगार यामध्ये जो तफावत आहे तो देखील कामगारांना देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. त्याचबरोबर ठेकेदाराचे १० लाख रुपयांचे डिपॉझिट देखील जप्त केले जावे अशी देखील मागणी चिवटे यांनी केली.

या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्ध समाजातील कामगारांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येत्या १४ एप्रिलला साजरी होणार असून, या पार्श्वभूमीवर या कामगारांना त्यांच्या पगाराची अत्यंत गरज आहे. मात्र ठेकेदाराकडून वारंवार पगार न देण्याचे प्रकार घडत आहेत. कामगारांच्या पगारातील या तफावतीमुळे आणि थकलेल्या पगारामुळे त्यांच्यावर आर्थिक अडचणी ओढवलेल्या आहेत. येणाऱ्या सणासाठी तरी कामगारांना तातडीने पगार देण्यात यावा, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.





