मांगी तालवाची 50% कडे वाटचाल – आज सकाळपर्यंत 42.77% पाणीसाठा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : नगर जिल्ह्यात काल (ता.१२) झालेल्या मुसळधार पावसामुळे आज मांगी तलावाची पाणीपातळी वाढली असून सध्या या तलावाची ५०% कडे वाटचाल सुरू आहे, आज (ता.१३) सकाळपर्यंत या तलावात ४२.७७% पाणीसाठा जमा झाला आहे.
राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस असताना करमाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते, परंतु काल झालेल्या पावसामुळे तालुक्यातील बरेचशा भागातील चित्र बदलेले दिसत आहे. तरीही करमाळा तालुक्यातील आणखी चार लघु प्रकल्प तळपातळीवरच आहेत, काही भागात परिसरात पावसाचा जोर अत्यंत कमी असल्याने मागील दोन-तीन महिन्यापूर्वी अत्यल्प पाणीसाठा या लघुप्रकल्पात आहे.
करमाळा तालुक्यातील म्हसेवाडी, कुंभेज, कोंढेज, सांगवी हे चार प्रकल्प १००% भरलेले आहेत. करमाळा तालुक्यासह इतर तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे काल १२ सप्टेंबरच्या रात्री नगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मांगी तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे.
मांगी प्रकल्प भरल्यानंतर या मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह मांगी तलावाच्या खालील बारा गावच्या बोरगाव पाणीपुरवठा योजनेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो त्यामुळे या तलावाच्याखालील लाभ क्षेत्रातील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अवघ्या रात्रीतून पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे, तलावातील शेती पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे.
मांगी तलावातील पाण्याचा उपयोग नियोजनबद्ध करावा, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तलावातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणी टंचाईचा होणार नाही, त्याचप्रमाणे मांगी तलावावरती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांची सफाई करण्यात यावी अशी मागणी मांगी येथील प्रवीणकुमार अवचर यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेले आहे.