जनावरांच्या “लम्पी” आजारावरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण उद्यापासून राजुरीत सुरु : डॉ.अमोल दुरंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जनावरांच्या “लम्पी” आजारावरील प्रतिबंधात्मक ‘मोफत लसीकरण’ ग्रामपंचायतीमार्फत उद्यापासून राजुरी (ता.करमाळा) येथे सुरु होत असून सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांनी केले आहे. या मोफत लसीकरणाचा शुभारंभ उद्या (ता.१४) सकाळी 8 वाजता राजुरी येथे पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रवीण शिंदे हस्ते होणार आहे.
शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्व जनावरांना डॉ.झोळ व त्यांच्या टीमकडून लस टोचवून घ्यावी. शेतकऱ्यांनी लंपी आजाराला घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय योजनाकडे लक्ष द्यावे. शक्यतो जनावरांना गावाच्या बाहेर घेऊन जाऊ नये. लम्पिची कोणतीही लक्षणे आढळल्यास ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय अधिकार्यास संपर्क साधावा.
अशी माहिती लोकनियुक्त सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांनी दिली.