उजनी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावांच्या समस्यांबाबत चर्चेसाठी करमाळ्यात ४ डिसेंबरला मीटिंग
करमाळा / संदेश प्रतिनिधी – उजनी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या करमाळा तालुक्यातील ३० गावांच्या समस्या बाबत चर्चा करण्यासाठी येत्या ४ डिसेंबरला करमाळा येथील पंचायत समिती सभागृहात मीटिंग आयोजित केली आहे. याबाबतचे पत्र पुनर्वसन विभागाकडून शासनाच्या विविध विभाग प्रमुखांना दिले आहे.
करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे, यांनी पुनर्वसित गावांच्या समस्या बाबत चर्चा करण्यासाठी मीटिंग घ्यावी अशी मागणी जून महिन्यात सोलापूर येथील उजनी पुनर्वसन विभागाला केली होती. करमाळा तालुक्यातील ३० गावे उजनी धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुनर्वसित झालेली आहेत. पुनर्वसन विभागाकडून सदर गावांमध्ये १८ नागरी सुविधांचे लाभ मिळणे आवश्यक होते, त्यापैकी एकाही गावांमध्ये सर्व १८ सुविधांचे लाभ अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तसेच काही गावांमध्ये कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ६ लाभ अद्यापही मिळालेले नाहीत. अशा पुनर्वसित गावांच्या समस्या बाबत चर्चा करण्यात यावी अशी मागणी आमदार शिंदे यांनी पत्राद्वारे पुनर्वसन विभागाला केली होती.
या पत्राला पुनर्वसन विभागाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सोपान टोंपे यांनी २४ नोव्हेंबर रोजी प्रतिसाद देत येत्या ४ डिसेंबर रोजी करमाळा येथील पंचायत समिती सभागृहात मीटिंग आयोजित केली आहे. या मीटिंगला शासनाच्या विविध कार्यालय प्रमुखांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.