श्रीमती रत्नमाला होरणे यांना नारीशक्ती सन्मान पुरस्कार

करमाळा(दि.२८): सर फाउंडेशन स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय ‘नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2025’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंदर या शाळेच्या शिक्षिका श्रीमती रत्नमाला दत्तात्रय होरणे यांना जाहीर झाला आहे.

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन ही संस्था देशपातळीवरील प्रयोगशील व कृतीशील शिक्षकांचा गौरव करते. श्रीमती होरणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि भावनिक उपक्रम, विविध सामाजिक उपक्रमांतील सहभाग, तसेच शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवरील लेखन व कविता प्रसिद्ध करून समाजप्रबोधन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामध्ये शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीचाही समावेश आहे. या सर्व कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल कंदर परिसरातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. इब्राहिम मुलाणी, उपाध्यक्ष सौ. स्वाती सुरवसे व सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चिंतामण व सर्व शिक्षकवृंद, तसेच कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. देवकर व करमाळा तालुक्यातील सर्व शिक्षकवर्ग तसेच गट शिक्षणाधिकारी श्री. नलवडे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.




