हनुमंत लोखडे यांनी साहित्यसंशोधन क्षेत्रात केलेले काम कौतुकास्पद : नागराज मंजुळे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : हनुमंत लोखंडे सारख्या ग्रामीण आणि अभावग्रस्त पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या मित्राने साहित्य समीक्षेच्या क्षेत्रात केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व कवी नागराज मंजुळे यांनी पुणे येथील प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.
डॉ.हनुमंत लोखंडे यांच्या “रेप्रेझेन्टेंशन्स ऑफ दलित प्रोटागोनिस्टस: इंडियन इंग्लिश फिक्शन अँड मराठी दलित लिटरेचर” या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन पालग्रेव मॅकमिलन या जागतिक पातळीवरील आघाडीच्या प्रकाशन संस्थेने केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सभारंभ नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे येथे मोठया थाटामाटात पार पडला.
आटपाट व वाडिया महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन सोहळ्यात नागराज मंजुळे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत प्रा. गोपाल गुरू,प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी,समीक्षक प्रा.दिलीप चव्हाण, प्रा.कमलाकर भट आदि मान्यवर उपस्थितीत होते.यावेळी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा.सचिन सानप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना हनुमंत लोखडे यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देऊन नागराज मंजुळे म्हणाले की, तुम्ही कुठे पोहचलात याचे मूल्यमापन करताना तुमची सुरुवात कुठून झाली हे तपासले तर मूल्यमापन अधिक न्याय देणारे ठरते.
यावेळी बोलताना प्रा.गोपाल गुरू म्हणाले की,भारतीय इंग्रजी कादंबरी व मराठी दलित नायकांच्या चित्रणांचा डॉ.हनुमंत लोखंडे यांनी केलेला तैलनिक अभ्यास भारतीय समीक्षा विचारांना पुढे नेणारा आहे,
हनुमंत लोखडे या आपल्या मित्राचे कौतुक करून अभिनेते जोशी यांनी या पुस्तकाचे मराठी भाषेत भाषांतर केले तर ते मराठी साहित्यसमीक्षेत मोलाची भर घालेल अशी आशा व्यक्त केली.
ख्यातनाम समीक्षक प्रा. दिलीप चव्हाण यांनी आपल्या भाषणात प्रा. लोखंडे यांनी जागतिक परिप्रेक्षात केलेल्या दलितांच्या चित्रणाचे अनेकविध पैलू उलगडून दाखविले व अशा प्रकारचा सामूहिक अभ्यास व्यापक स्वरूपात पुढे नेण्याची गरज प्रतिपादन केली. प्रा भट यांनी लोखंडे यांच्या साहित्य समीक्षेचे पोस्ट कलोनियल अंगाने विविध पैलू उलगडून दाखविले तर प्रा. निखिल नारकर यांनी लोखंडे यांच्या विद्यार्थी सहजीवनातील विविध आठवणीना उजाळा दिला. तसेच प्रा. सचिन सानप यांनी डॉ.लोखंडे यांचे लेखन समीक्षा क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांना दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले.
प्राचार्य वसंत चाबुकस्वार यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा. सोनाली मोरे-मधाळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे माजी विश्वस्त प्रा.अशोक चांडक, नेविल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य आनंद धडस, विविध विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व लोखंडे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रा.डॉ. हनुमंत लोखडे हे करमाळा तालुक्यातील झरे गावचे असून त्याचे पदवी पर्यंतचे शिक्षण जेऊर येथील भारत महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. प्रा.लोखडे हे भारत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या या कामगिरी बद्दल आमदार नारायण आबा पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे, महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.रमेश पाटील,डॉ. संजय चौधरी यांनी अभिनंदन केले.