धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चोंडी येथे १७ सप्टेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन - करमाळा ते चोंडी मोटारसायकल रॅली.. - Saptahik Sandesh

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चोंडी येथे १७ सप्टेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन – करमाळा ते चोंडी मोटारसायकल रॅली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : एस.टी.धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी यासाठी चोंडी (ता.जामखेड) येथे यशवंत सेनेचे समाज बांधव गेली आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत, तरी देखील सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी अद्याप दखल घेतली नाही, त्यामुळे या सरकारच्या निषेधार्थ व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी १७ सप्टेंबरला चोंडी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करमाळा तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आले असून, हे आंदोलन करमाळा ते चोंडी मोटारसायकल रॅली काढून करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी दिली.

एस.टी.धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी यासाठी चोंडी येथे यशवंत सेनेचे समाज बांधव गेली आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून देखील सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी अजून देखल दखल घेतली नाही, त्या उपोषण कर्त्यांची तब्येत दिवसेदिवस ढासळत असून, प्रशासन समाज बांधवांच्या जिवाशी खेळत आहेत. १७ सप्टेंबर रोजी रविवारी जेऊर (ता.करमाळा) येथील बाजारतळ येथून सकाळी ९:०० वाजता निघणार असून, पुढे करमाळा शहरातील दत्त मंदिर येथून सकाळी ९:३० वाजता मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ होणार आहे.

त्यानंतर चोंडी येथे जावून करमाळा तालुक्याच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रा.बंडगर यांनी सांगितले. चोंडी (ता.जामखेड) येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना जाहीर पाठींबा देण्यासाठी या आंदोलनाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त सकल धनगर समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!