'आपले हरितमित्र’ (कवयित्री : सारिका बोबे-मुसळे) -

       ‘आपले हरितमित्र’
(कवयित्री : सारिका बोबे-मुसळे)

0

कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नारायण बोबे सर यांच्या माध्यमातून ‘आपले हरितमित्र’ व ‘माझा महाराष्ट्र’ हे दोन काव्यसंग्रह हातात आले.
    ते पाहताच एक आगळा-वेगळा सुखद धक्का बसला. हे दोन्ही काव्यसंग्रह सरांच्या कन्या सौ. सारिका मुसळे व सौ.प्रतिभा हारके यांनी लिहिले आहेत, हे समजल्यावर त्यांचे कौतुक अधिकच वाटले.

या दोन्ही काव्यसंग्रहांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये निर्माण झालेला ‘मधुसिंधू’ हा अभिनव काव्यप्रकार. या काव्यप्रकारात चार ओळी असतात—
पहिल्या व चौथ्या ओळीत पाच अक्षरे व यमक,
दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत सहा अक्षरे व  यमक
अशी रचना असून, ही बांधणी अतिशय शिस्तबद्ध आणि गंमतीशीर आहे. मराठी काव्यप्रकारांत हा नवा प्रयोग निश्चितच उल्लेखनीय ठरतो.
कवयित्री सारिका बोबे मुसळे यांचा ‘आपले हरितमित्र’ हा काव्यसंग्रह पूर्णतः निसर्गकेंद्री आहे. नारळ, आंबा, वड, पिंपळ, रामफळ, सीताफळ, डाळिंब, केळी यांसह सुमारे १६० हून अधिक झाडे, फळे, भाज्या व मसाले यांचे या संग्रहात वर्णन आढळते. केवळ सौंदर्य वर्णनापुरते न थांबता, प्रत्येक घटकाचे उपयोग, आरोग्यदायी गुणधर्म व महत्त्व सहज, सोप्या आणि काव्यमय शब्दांत मांडले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या
“आम्हा वृक्षवल्ली सोयरे वनचरे”
या अभंगाची आठवण करून देणारी ही काव्यरचना निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट करते. नारळ (श्रीफळ) यापासून राष्ट्रीय वृक्ष वड ते विविध भाज्या, मसाला झाडे, वनस्पतीवर काव्य करून प्रत्येकचे वैशिष्ट्य, त्याचा विस्तार, उपयुक्तता व महत्त्व ओव्या व मधुसिंधू काव्यप्रकारातून प्रभावीपणे उलगडले आहे. संपूर्ण संग्रहात १०६३ चरणांची समृद्ध रचना आढळते.

या संग्रहातील शेवटची ‘हरितमित्र’ ही कविता विशेष उल्लेखनीय आहे. वृक्षतोड थांबवावी, निसर्ग जपावा, हा संदेश प्रभावी शब्दांत मांडला असून तो काळाची गरज अधोरेखित करतो.
हादग्याच्या फुलांची भाजी असो, धोतऱ्यासारख्या दुर्लक्षित वनस्पतींचे औषधी गुणधर्म असोत, किंवा शेवंती, गोकर्ण, अननस, आंबा यांचे गुणविशेष—प्रत्येक कवितेत कवयित्रीची निरीक्षणशक्ती, अभ्यासपूर्ण दृष्टिकोन व शब्दकौशल्य प्रकर्षाने जाणवते. विषारी मानल्या जाणाऱ्या धोतऱ्याचेही औषधी उपयोग सांगताना आवश्यक ती खबरदारी अधोरेखित केली आहे, ही बाब विशेष महत्त्वाची ठरते.
‘आपले हरितमित्र’ हा काव्यसंग्रह केवळ कविता म्हणून नव्हे, तर निसर्गज्ञान, आरोग्यविषयक माहिती व पर्यावरण जागृती यांचा संगम म्हणून संग्रहणीय आहे.

कवयित्री सारिका बोबे मुसळे यांचा हा दुसरा प्रयोग असून, याआधी त्यांचा ‘रात्र काजव्यांची’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. सावित्रीच्या लेकी, राजश्री हिरकणी, साहित्य साधना तसेच तालुकास्तरीय आदर्श शिक्षक असे विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. सध्या त्या डोमगाव (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
निसर्ग, साहित्य व समाज यांना जोडणाऱ्या या मौलिक काव्यनिर्मितीसाठी कवयित्री सारिका बोबे मुसळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, करमाळा…
मो.नं.9423337480

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!