अस्थी विसर्जन न करता खड्डा खोदून केले वृक्षारोपण – पठाडे परिवाराचा आदर्श उपक्रम
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. 15 : अस्थी विसर्जनाची राख नदीच्या पाण्यात न टाकता, शेतातील बांधावर खड्डा खोदून त्यात पुरून त्या ठिकाणी वृक्षारोपण करून पठाडे परिवाराने एक आगळावेगळा व आदर्श उपक्रम राबवला आहे. पोथरे (ता.करमाळा) येथील यशवंत बाबू पठाडे यांचे निधन नुकतेच झाले आहे.
यशवंत पठाडे यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी सावड्ण्याचा विधी करण्यात आला. या विधीनंतर अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम केला जातो, ही अस्थी नदीपात्रात सोडली जाते, त्यामुळे अस्थी विसर्जनानंतर नदी पात्रात प्रदूषण होत आहे. त्यामुळे परंपरेला फाटा देत हरिश्चंद्र झिंजाडे, नाना पठाडे, वामन पठाडे, शिवाजीराव झिंजाडे, चंद्रकांत झिंजाडे, अनिल झिंजाडे, शांतीलाल झिंजाडे, शहाजी रोही यांनी पुढाकार घेत अस्थी नदीपात्रात न सोडता शेतातील बांधावर मोठा खड्डा खोदून त्यामध्ये रक्षा विसर्जित केली व त्याठिकाणी वृक्षारोपण केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पठाडे परिवाराने राबवलेल्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल शनैश्वर दिंडी सोहळा संस्था, हनुमान भजनी मंडळ पोथरे व करमाळा येथील ग्रामसुधार समितीने स्वागत केले.