करमाळा शहरात वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या लॉजवर पोलिसांची कारवाई -

करमाळा शहरात वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या लॉजवर पोलिसांची कारवाई

0

करमाळा(दि. २२):  शहरातील भवानी पेठ येथील श्री कमलाभवानी लॉजवर पोलिसांनी धाड टाकत अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून तिथून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. भरदिवसा करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई दिनांक २० जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. संशयित आरोपीचे नाव प्रथमेश सुनील राठोड (वय २२, रा. भवानी पेठ, करमाळा) असे असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भवानी पेठेतील श्री कमलाभवानी लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिनगारे, दादासाहेब घाडगे, हवालदार भाऊराव शेळके, आप्पासाहेब लोहार, मिलिंद दहीहांडे, स्वप्नील शेरखाने आणि शीतल पवार यांचा समावेश होता.

दोन पंच आणि बनावट ग्राहकांच्या मदतीने केलेल्या कारवाईत पोलिसांनी लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. घटनास्थळी तीन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रथमेश राठोड याने सदर लॉज त्याच्याच मालकीची असल्याचे सांगून, महिलांकरवी ग्राहकांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी हवालदार भाऊराव उत्तरेश्वर शेळके यांनी फिर्याद दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!