महिलेचा विनयभंग करत मारहाण करणाऱ्यांना ६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कोर्टी (ता. करमाळा) येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या ३५ वर्षाच्या तरूणीस तेथील काही लोकांनी ९ डिसेंबरला विनयभंग करून मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीसांनी संबंधित आरोपींना ४ जानेवारीला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी संबंधित आरोपींना ६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ९ डिसेंबरला रात्री आठ वाजता कोर्टी येथील चहाच्या टपरीवर काम करत असताना बाबासाहेब जाधव, रामदास जाधव, आकाश जाधव आदीजण आले व त्यांनी तु इथे रहायचे नाही असे म्हणून अपमानास्पद भाषा वापरली. तसेच माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्ह्यातील पाच आरोपींना पोलीसांनी ४ जानेवारीला अटक केली होती. त्यात त्यांना ६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.



