चव्हाण महाविद्यालयाच्या प्रा. सुजाता भोरे यांना राज्यस्तरीय आदर्श व कृतिशील शिक्षिका पुरस्कार

करमाळा(दि.१९) : करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा.सौ. सुजाता भोरे यांना नुकताच स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श व कृतिशील शिक्षिका पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श माता,आदर्श मुख्याध्यापिका व आदर्श कृतिशील शिक्षिका पुरस्काराचे वितरण सोलापूर येथे करण्यात आले. सौ.भोरे गेली 20 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी प्रा.सौ.सुजाता भोरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव मा. विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व यशवंत परिवारातील सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.
हा पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांच्या शुभहस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख संस्थापक सेवा फाउंडेशनचे मनीष काळजे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिन जगतापसाहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर, सचिन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

गेल्या 20 वर्षात प्रा.सौ. सुजाता भोरे यांनी महाविद्यालयात अभ्यासक्रमात नवनवीन संकल्पना विकसित केल्या असून सामाजिक क्षेत्रात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, जनजागृती रॅली, सेंद्रिय शेती,जलसंधारणाची कामे, फटाके मुक्त अभियान,मतदान जनजागृती, एड्स रॅली या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी झाल्या होत्या. तसेच गेली 17 वर्ष एन.एस.एसच्या माध्यमातूनही स्वच्छता मोहीम, हागणदारी मुक्तीची गुढी, डास मुक्त गाव अशा संकल्पना राबविण्यात भरघोस कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अडसूळ यांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती. या पुरस्काराबद्दल त्याचे सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



