विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांबरोबर पालकांचीही महत्त्वाची जबाबदारी : प्रा.सुनील भांगे

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे… कंदर (ता.करमाळा) येथील श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेची सण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची पहिलीच शिक्षक पालक सहविचार सभा आज शनिवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी गौरीहर सरडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अमोल नलवडे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रस्ताविकामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेश्मा उबाळे यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा उपस्थित पालकांसमोर मांडला. यावेळी पालकांमधून दादासाहेब पांडव यांचे सह इतर पालकांनाही आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक प्राध्यापक सुनील भांगे म्हणाले की मुलांना लहान वयातच त्यांचा पाया भक्कम होणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही त्यांच्या बुद्धिमत्ता नुसार त्यांना शिक्षण देत आहोत. पण घरी गेल्यावरही मुलांकडे पालकांनी आवर्जून लक्ष द्यावे. आपल्या शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने विद्यार्थी संख्येत चांगल्या प्रमाणात वाढ होत आहे. ही निश्चितच बाब कौतुकास्पद आहे. मुलांची प्रगती जर करायची असेल तर शिक्षणाबरोबर संस्कार ही महत्त्वाचे आहेत.
त्यामुळे घरात वावरताना मुलांच्या आई-वडिलांनी वातावरण आनंदी ठेवले पाहिजे. मुलांना टीव्ही मोबाईल पासून दूर ठेवून त्यांना मोठ्या थोर संतांची विचारवंत आणि हुतात्म्यांची पुस्तके वाचण्यासाठी द्यावीत. आम्ही मुलांना शिक्षणाबरोबर त्यांच्यातील इतरही कलागुणांना वाव देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. मुलांना प्रेम माया देण्याबरोबर वेळप्रसंगी कठोर होणेही आवश्यक आहे. आज आयोजित केलेल्या शिक्षक पालक सभेला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सुनिता लांडगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका वैभवी गायकवाड यांनी मानले..


