पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी “भारत जोड़ो” यात्रेत सहभागी व्हावे – ॲड.सविता शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.१९) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी ते कश्मीर ‘भारत जोड़ो’ यात्रा सुरु झालेली आहे. या यात्रेत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे.
याबाबत पुढे बोलताना ॲड.सविता शिंदे म्हणालय की, या यात्रेत विविध पुरोगामी जनसंघटनांचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. देश आज मोठ्या संकटातुन जात आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांनी समाजात जातीय, धार्मिक द्वेष पसरवून सत्ता मिळवने व ती द्वेषाच्या आधारेच टिकवून ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यासाठी संविधान मोडीत काढण्याचा छुपा अजेंडा भाजप प्रणित सरकार राबवत आहे.
वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. मोदी शहांच्या मित्रांची मात्र संपत्ती अब्जावधी रुपयांनी वाढत आहे. याविरुद्ध आवाज उठू नये म्हणून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान हे सत्ताधारी करत आहेत. परंतु या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांविरुद्धचा आवाज बुलंद करण्याचे काम भारत ‘जोडो यात्रे’द्वारे होत आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना देशातील द्वेष भावना नष्ट होऊन देशात शांतता, प्रेम, सौहार्द वाढीला लागून देशाची खऱ्या अर्थाने प्रगती व्हावी असे वाटत असेल त्यांनी भारत यात्रेत सहभागी व्हावे असेही ॲड.शिंदे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत यात्रेचे साधारणतः ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात देगलूर, जि. नांदेड येथे आगमन होईल. त्यापूर्वी १ ते ७ नोव्हेंबर विविध जनसंघटना कोल्हापूर ते देगलूर अशी नफरत छोडो, संविधान बचाओ, भारत जोडो’ यात्रा आयोजित करत असून पुढे देगलूर पासून मुख्य यात्रेत सहभागी होतील. तिथे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेवर आधारित काही पुस्तके राहुल गांधींना जनसंघटनांच्या वतीने भेट देण्यात येतील. कोल्हापूर ते देगलूर यात्रेच्या आयोजनाबाबत सोलापूर जिल्हा जनसंघटनांची बैठक दि. २१ रोजी पंढरपूर येथे आयोजित केली आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने पुरोगामी व्यक्ती, कार्यकर्ते व संघटनांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन ॲड.सविता शिंदे यांनी केले आहे.