उर्वरीत अतिवृष्टीग्रस्तांना मदत न मिळाल्यास आंदोलन करणार – राजाभाऊ कदम

केम(संजय जाधव): २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊनही मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी, अन्यथा बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी दिला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कदम यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी उभी पिके वाहून गेली, जमिनीची सुपीक माती खरडून गेली तसेच काही शेतकऱ्यांचे जनावरेही दगावली. उजनी परिसरात पाणी साचल्याने केळी व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले.या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. काही शेतकऱ्यांना मदत मिळाली असली तरी अद्याप अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पंचनाम्याचे आदेश दिले तहसीलदार यांनी तलाठी मंडळंधिकारी यांच्या माध्यमातून सर्व पंचनामे केले मात्र काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे अद्यापही हजारो शेतकरी मदती पासून वंचीत आहेत. शेतकरी तहसील कचेरीकडे हेलपाटे मारतात; शेतकऱ्यांचे समाधान होत नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन देखील आर्थिक मदती पासून वंचित राहिले आहेत त्या शेतकऱ्यांची मदतीची रक्कम किती मंजूर आहे त्यांची नावे व नावा पुढे त्यांची रक्कम लिहून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत ऑफिसबाहेर यादी चिटकवावी. तसेच तहसील कार्यालयामध्ये शेतकरी चौकशी साठी आल्यास सबंधित कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला उद्धटपणे बोलू नये शांतपणे समजून सांगावे.

येत्या आठ दिवसात शेतकऱ्याचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पैशे नाही मिळाल्यास शेतकऱ्यांना घेऊन बहुजन संघर्ष सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजाभाऊ कदम यांनी दिला आहे. या वेळेस त्यांच्या समवेत योगेश कोंडलकर,दादा करे,विलास बोराडे ,बदर, भाऊ सरडे आदी शेतकरी उपस्थित होते.

