राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची मूठ बांधली-पुणे येथे करे-पाटील यांचेउदगार -

राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची मूठ बांधली-पुणे येथे करे-पाटील यांचे
उदगार

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची मूठ बांधली , शिवरायांना उत्तम संस्कार व धर्मनिरपेक्ष राज्याची शिकवण दिली. लष्करी धडे व दुष्टप्रवृत्तीबद्दल तिरस्कार या गोष्टी शिकविल्या . त्यातून शिवबांनी स्वराज्यासाठी स्वतःचे राज्य निर्माण केले . खऱ्या अर्थाने जिजाऊ या स्वराज्यप्रेरिका होत्या असे मत पुणे येथील यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.

भोसरी येथील राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत प्रा.गणेश करे-पाटील बोलत होते. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व भोजापूर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ व १२ जानेवारी २०२४ रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविदयालयाच्या प्रांगणात मा.श्री विश्वास पाटील यांचे ‘महापिता शहाजी , महामाता जिजाऊ आणि शिवराय ‘ व गणेश करे पाटील यांचे ‘गरज जिजाऊंच्या विचारांची ‘ या विषयांवरील व्याख्याने संपन्न झाली. जिजाऊ व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना प्रसिद्ध व्याख्याते प्रा.श्री. करे पाटील बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के .जी . कानडे यांनी केले . आपल्या प्रास्ताविकात भोजापूर व राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेची पार्श्वभूमी स्पष्ट केली . अनेक नामवंत वक्त्यांनी या व्याख्यानमालेत व्याख्याने दिलेली असून सामाजिक प्रबोधनाचे हे उत्तम व्यासपीठ असल्याचे मत प्रतिपादन केले .

संस्थेचे खजिनदार व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर अजितभाऊ गव्हाणे यांनी आपल्या मनोगतात, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कामगार व मध्यमवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्था उभी केली असून त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. याचे आम्हाला समाधान वाटते असे मत मांडले.

संस्थेचे विश्वस्त सुमित मुंगसे यांनी आपल्या मनोगतात , राजमाता जिजाऊ शैक्षणिक संकुलात आपण शिकता खरोखरचे तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात .ज्या मातेने शिवबा घडविला ,त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण चांगले यशस्वी व्हाल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संस्थेची स्थापना केलेली असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले जाते. राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला महाविदयालयीन विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केली जाते .हा सामाजिक उपक्रम निरंतर चालू ठेवणार असल्याचे मत मांडले .

राजमाता जिजाऊंच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंतच्या विविध प्रसंगांचे वर्णन असलेल्या ‘स्वराज्याची मुहूर्तमेढ ‘ या नाटिकेचे सादरीकरण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त दिनांक १० व ११ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, प्रोजेक्ट व फनफेअर स्पर्धांच्या प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले .

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ .नेहा बोरसे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!