प्रशासन शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहतय का ? ॲड. सावंत - Saptahik Sandesh

प्रशासन शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहतय का ? ॲड. सावंत

करमाळा/तालुका प्रतिनिधी

करमाळा : मकाईने शेतकऱ्याच्या उसाचे गेल्या १४ महिन्यापासून पैसे दिले नाहीत, त्यामुळे शेतकरी संतप्त झाला असून, जवळपास २५० शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. असे असूनही प्रशासन मुग गिळून गप्प का..? प्रशासन शेतकऱ्यांच्या मरणाची वाट तर पहात नाही ना..? असा उपरोधीक प्रश्न शेतकऱ्यांचे नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. राहुल सावंत यांनी विचारला आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे बील गेल्या १४ महिन्यापासून दिले नाही. त्यासाठी वारंवार आंदोलन करूनही व शेतकरी मरणाच्या दारात पोहचूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ॲड. सावंत यांनी सतप्त होवून वरील प्रमाणे प्रश्न केला आहे. सा. संदेश शी बोलताना ॲड. सावंत म्हणाले की, अंदाजे १५०० शेतकऱ्यांचे जवळपास २६ कोटी ३२ लाख रूपये येणे आहे. अनेकांनी या पैशावर खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन तातडीच्या गरजा भागवल्या होत्या. आत्ता सावकाराचे पैसे मुद्दलेपेक्षा जास्त झाले. काहीनी घरातील लग्ने या पैशासाठी पुढे ढकलली आहेत, ती लग्न रखडली आहेत.

अनेकांनी या पैशावर व्यापारपेठेतून वस्तु घेतल्या आता त्यांची बाजारतील पत संपली व व्यापारी त्यांना दारात उभे करत नाहीत. अनेकांना दवाखान्यासाठी पैशाची गरज असूनही पैसे मिळाले नाहीत. हे पैसे न मिळाल्याने अनेकांना जगणे मुश्कील झाले आहे. जिल्हाधिकारी कुमार अर्शिवाद यांनी येत्या २५ जानेवारी पर्यंत हा प्रश्न सोडवू असे असे अश्वासन दिले आहे. जर त्यांनी हा प्रश्न सोडवला तर ठीक अन्यथा २६ जानेवारीलाआत्मदहनाचे आंदोलन केले जाणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले आहे.

याबाबत अत्तापर्यंत शेतकऱ्यांचे रस्ता रोखो आंदोलन, उपोषण, बोंबा बोंब आंदोलन, थु-थु आंदोलन, भजन करत, बैलेगाढव-कोंबड्या आणून ठिय्या आंदोलन केले. याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी वांरवार बैठका घेऊन बिले देवू, असे सांगूनही कोणतीही पुर्तता केली नाही. एवढेच नाहीतर संबंधित मकाई च्या संचालकावर गुन्हे दाखल करणे, त्यांची मालमत्ता जप्त करणे अशी कारवाई करणे आवश्यक होते पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता २६ जानेवारीला आत्मदहनाचे आंदोलन जाहीर केले आहे. – ॲड.राहुल सावंत, करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!