वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम– करमाळ्यात जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रम

करमाळा (दि.२६) – “वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असून ते जीवनाला नवदिशा देते,” असे मत प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते नवनाथ लोंढे यांनी व्यक्त केले. ते श्री ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय करमाळा येथे आयोजित जागतिक पुस्तक दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

नगर परिषद करमाळा संचालित ग्रंथालयात २३ एप्रिल २०२५ रोजी ३० वा जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्रंथालयाचे आद्यजनक एस.आर. यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा सोहळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. सचिन तपंसे व प्रमुख वक्ते नवनाथ लोंढे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक धनंजय कविटकर, लेखापरीक्षक सोमनाथ सरवदे, शिक्षिका स्वाती माने, जाधव मॅडम, बहाड मॅडम, उपग्रंथपाल प्रवीण चौकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
“पुस्तकांनी मला काय दिले?” या विषयावर बोलताना नवनाथ लोंढे म्हणाले, “मी फार मोठा वाचक नाही, परंतु मी जे वाचले ते दर्जेदार होते. वाचनामुळेच मी वक्ता म्हणून घडलो आणि गेली २९ वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहे. आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, गाडगेबाबा यांच्या साहित्याने आणि भारताच्या संविधानाने मला जीवनाचे खरे अर्थ शिकवले.”


यानंतर त्यांनी काही प्रेरणादायी कविता सादर करत रसिकांची मनं जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण चौकटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्वाती माने यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन धनंजय कविटकर यांनी केले. हा कार्यक्रम प्रेरणादायी, आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारा आणि वाचनप्रेम वृद्धिंगत करणारा ठरला.



