केममध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस – एका रात्रीत परिसर जलमय
केम/तुषार तळेकर
करमाळा : केम व परिसरात काल (दि.६) गुरुवारी दुपारी २ च्या नंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळला व त्यामुळे केम परिसर जलमय झाला. या धुवांधार झालेल्या पावसाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले.
गुरुवारी रात्रभर चालू असलेल्या पावसामुळे केम परिसरातील विहिरी भरल्या. ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. सगळे रस्ते पाण्याखाली गेले. केम गावातील श्री उत्तरेश्वर ओढा खूप वर्षानंतर वाहिला. तो पाहण्यासाठी सकाळी लोकांनी गर्दी केली होती.
या मुसळधार झालेल्या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. यात केळी, द्राक्ष, कांदा, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचा पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.