रोटरी क्लबच्या हॅप्पी स्कुल योजनेने भोगेवाडीच्या शाळेचा कायापालट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – राज्यातील विविध रोटरी क्लबच्या हॅप्पी स्कूल या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट केला जात आहे. अशाच प्रकारे पुणे येथील रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटच्या वतीने भोगेवाडी (ता. माढा) येथील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयात १८ जून रोजी हॅप्पी स्कूल योजना राबविण्यात आली. या अंतर्गत शाळेतील समस्या सोडवत शाळेला अत्याधुनिक करण्याचे काम या रोटरी क्लबने हाती घेतले.
या हॅप्पी स्कुल योजने अंतर्गत रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने या शालेय आवारात 50 फूट खोल विहीर त्यावरती एक मोटर, दहा संगणक , मुलांना बसण्यासाठी बेंचेस, ऑफिस फर्निचर, प्रत्येक विद्यार्थ्याला जेवणाचा स्टीलचा डबा , स्टीलची पाण्याची बॉटल व पेन इत्यादी वस्तू देण्यात आल्या. त्याचप्रमाणे शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले
रोटरी क्लबच्या वतीने शाळेला देण्यात आलेल्या शैक्षणिक मदतीमुळे शाळेचे प्रशासन, विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकल्पासाठी ऑल वर्क्स इंडिया ,मराठवाडा मित्र मंडळ व समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक व भेटवस्तूच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केले.
१८ जून रोजी सदर हॅप्पी प्रकल्पाचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट चे अध्यक्ष अशोक शिंदे त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी लाईट चे सर्व सदस्य हजर होते. याच बरोबर शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर पवार यांनी केले व सर्वांचे आभार गोविंद जगदाळे यांनी मांडले.
करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावचे सुपुत्र व सध्या चिंचवड येथे जगदाळे क्लासेस चालविणारे गोविंद जगदाळे सर यांचे भोगेवाडीच्या संजयमामा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणित विषयाचे मार्गदर्शन चालू आहे. या कालावधीत शाळेतील शिक्षकांनी शाळेतील विविध अडचणी श्री जगदाळे सरांना सांगितल्याने त्यांनी या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने स्वतः संचालक असलेल्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी समोर मांडल्या. यानंतर सर्व सदस्यांनी सदर शाळेला मदत करण्याचे एकमताने मान्य केले तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटला सोबत घेत हा हॅप्पी स्कुल प्रकल्प राबवत शाळेला मोठ्या प्रमाणात मदत केली.