देलवडीच्या सचिन ढवळे यांची संरक्षण मंत्रालयात ‘सहाय्यक वैज्ञानिक’ म्हणून निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : देलवडी (ता.करमाळा) येथील सचिन सखाराम ढवळे यांची भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात ‘सहाय्यक वैज्ञानिक’ म्हणून निवड झाली आहे. देलवडी सारख्या छोट्या गावातून व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन पुढे आलेल्या सचिन ढवळे यांनी मिळविलेल्या यशाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
सचिन यांचे प्राथमिक ४ थी पर्यंतचे शिक्षण देलवडी येथे झाले तर १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण कुंभारगाव येथे झाले. ११वी,१२ वी करमाळा येथे व पुढील पदवीचे शिक्षण ( B.Sc Physics ) बारामती येथे तर पदव्युत्तर (M.Sc Physics) पुणे येथे झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१६ साली त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०२० मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या ‘सहाय्यक वैज्ञानिक’ (वर्ग २) या पदावर निवड झाली.
कोरोनामुळे २०२० ते २०२२ पर्यंत अनेक पदांच्या निवडी शासनाकडून थांबविल्या होत्या. तोपर्यंत सचिनने इतर परीक्षांची तयारी चालू ठेवली होती.अखेर ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना निवडीचे पत्र मिळाले,
तर नियुक्ती पत्र जानेवारी २०२३ मध्ये मिळाले. त्यांची कोलकाता येथे नेमणूक झाली आहे.
त्यांच्या या यशात आई शारदा ढवळे, वडील सखाराम रामदास ढवळे यांचा मोलाचा वाटा असून तसेच भाऊ, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी वेळोवेळी सहकार्य केले असल्याचे सचिन यांनी साप्ताहिक संदेशशी बोलताना सांगितले.