दिग्विजय बागल यांच्याकडून संतोष वारे यांना मारहाण

करमाळा (१८): मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिग्विजय बागल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या NCR मध्ये
म्हटले आहे की, १७ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास करमाळा जातेगाव रोडवरील हॉटेल मातोश्री येथे फिर्यादी संतोष वारे हे पत्नी राणी वारे यांच्यासोबत मित्र विजय बाळासाहेब घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान दिग्विजय बागल यांनी संतोष वारे यांना बाजूला घेऊन त्यांना हाताने मारहाण केली. तुम्ही मला का मारहाण करत आहात असे विचारले असता “सुभ्या गुळवेला पाठवलेला व्हिडिओ दाखव” अशी बागल यांनी विचारणा केली. त्यानंतर संतोष वारे यांनी आपला मोबाईल बागल यांना पाहण्यास दिला त्यावेळी त्यामध्ये त्यांना हवा असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाला नाही. त्यामुळे बागल यांनी वारे यांना पुन्हा मारहाण केली. तसेच मारहाण करताना तीन तोळ्याची सोन्याची चैन देखील गहाळ झाली आहे असल्याचे वारे यांनी सांगितले.

दिग्विजय बागल आणि घारगावच्या एका व्यक्तीमधील संभाषणाचा व्हिडिओ कुणीतरी व्हायरल केला असून तो व्हिडिओ मीच व्हायरल केला असल्याचा राग मनात धरून बागल यांनी मला मारहाण केली असल्याचे वारे यांनी माध्यमांना माहिती दिली.



