आदिनाथ कारखान्याचे भवितव्य मतपेटीत बंद – उत्सुकता निकालाची

0

करमाळा(दि.१७) – श्री आदिनाथ सहकारी साखर  कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शांततेत पार पडली.  एकूण ७२ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात २९,०४१ मतदारांपैकी १७,६५४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या पैकी १५,२२४ पुरुषांनी आणि २,४३० महिलांनी मतदान केले. एकूण मतदानाची टक्केवारी ६०.७९% इतकी झाली असून ही समाधानकारक असल्याचे निरीक्षकांकडून सांगण्यात आले.

निवडणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मतमोजणी आणि निकाल शनिवारी १९ एप्रिल रोजी  जाहीर होणार असल्याची माहिती कारखान्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे, विद्यमान आमदार नारायण पाटील तसेच झोळ गटाचे प्रा. रामदास झोळ यांनी आपापल्या पॅनलसह स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली.

आदिनाथ कारखान्याचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. कारखान्यावर कर्जाचा डोंगर आहे, अनेक देणी प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचा विश्वास मिळवणे, कारखान्याला नवसंजीवनी देणे हे सर्व सत्ता मिळवणाऱ्या पॅनलच्या हातात असणार आहे. १९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असून, आदिनाथ साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या नक्की कोणाच्या हाती जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!