ल्युथेनिया (यूरोप) देशातील अभ्यासकांची शेटफळ येथील ‘नागनाथ’ मंदिराला भेट..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : नागोबाला देव मानून त्याचा सांभाळ करणाऱ्या शेटफळ (ता करमाळा) येथील या प्राचीन नागनाथ मंदिराला ल्युथेनिया (युरोप) देशातील संस्कृती व परंपरा अभ्यासकांनी नुकतीच भेट दिली आहे. याप्रसंगी दुभाषीकाच्या मदतीने या वैशिष्ट्यपूर्ण गावाविषयीची विविध प्रकारची माहिती त्यांनी जाणून घेतली.
नागोबाला देव मानून त्याची पूजा करणाऱ्या असंख्य कोब्रा नागाचे वास्तव्य असणाऱ्या शेटफळ गावाविषयी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळाल्याने या गावाविषयी उत्सुकता असलेल्या ल्युथेनिया (यूरोप) देशातील जगातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व परंपरा यांचे अभ्यासक व पत्रकार यांच्या टीमने शेटफळ येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून येथील विविध माहिती जाणून घेतली.
येथील पुरातन नागनाथ मंदीराला भेट देऊन मंदीर रचना गावातील परंपरा यांची माहिती घेतली. करमाळा तालुक्यातील शेटफळ या गावांमध्ये नागांना देव मानून त्याची पूजा केली जाते याविषयी आणखी माहिती घेण्यासाठी या टीमने मुंबई येथील दुभाषी शाम दुबे या गाईडला सोबत घेऊन थेट शेटफळ गाठले.
या गावातील लोकांशी चर्चा करून माहिती घेतली येथील प्राचीन मंदिराला भेट देऊन त्याचे फोटो व छायाचित्रण केले, याठिकाणी जिव्हाळा ग्रुपच्यावतीने सुरू असलेल्या किल्ले बांधणे स्पर्धेतील काही मुलांनी बनवलेल्या किल्ल्यांना भेट देवुन त्याची पाहणी केली व त्यांचे कौतुक केले. या अचानक आलेल्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत करून ग्रामस्थांनी त्यांचा पाहुणचार व त्यांच्यासोबत फोटो काढले. या परदेशी पाहुण्यांसोबत अनेकांना सेल्फि काढण्याचा मोह आवरला नाही.