कृष्णाजीनगर मधील नागरिकांकडून शंभूराजे जगताप व पो.उ. प्रवीण साने यांचा करण्यात आला सत्कार

करमाळा(संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील कृष्णाजी नगरमधील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जगताप गटाचे युवा नेते व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांचा व या उद्यानात मद्यपान करणाऱ्या मद्यपिंविरोधात कारवाई केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांचा कृष्णाजीनगर भागातील नागरिकांनी सत्कार केला.

करमाळा शहरातील कृष्णाजी नगरमध्ये असलेल्या शंभूराजे उद्यानाची देखभाल केली गेली नसल्याने गेल्या काही वर्षांपासून मोठी दुरावस्था झाली होती. या उद्यानात अस्वछता पसरली होती. या भागातील मुलांना खेळण्यास, तसेच नागरिकांना निवांत वेळ घालवण्यास या उद्यानाचा उपयोग तर होत नव्हताच अशातच काही मद्यपीनी या उद्यानाला दारू पिण्याची जागाच बनवली होती. दारू पिल्यानंतर दारूच्या बाटल्या, ग्लास, व इतर कचरा तिथे सोडून उद्यान अजूनच गलिच्छ केले जात होते. या मद्यपिंमुळे या भागातील नागरिकांना त्रास जाणवत होता. विशेषतः महिलांना असुरक्षितता निर्माण झाली होती.

या सर्व गोष्टींना वैतागून कृष्णाजीनगर भागातील नागरिकांनी एकत्र येत जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्याशी संपर्क साधत हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.

यानंतर शंभूराजे जगताप यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत करमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला व दारू पिणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी याची जबाबदारी घेत अशा लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

याबरोबरच शंभूराजे जगताप यांनी करमाळा नगरपरिषदेकडे या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी मागणी केली. त्यानंतर उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. लवकरच हे उद्यान नागरिकांना वापरण्यास खुले होईल व याच उद्यानात दिनांक 21 व 22 ऑक्टोबर रोजी किंग्ज फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी गरबा व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन शंभूराजे जगताप यांनी यावेळी दिली.

यानंतर कृष्णाजी नगर मधील नागरिकांनी
शंभूराजे जगताप व पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांचा सत्कार केला. यावेळी अनेक कृष्णाजी नगर अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!