रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू : शरद पवार
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : लोकसभा निवडणुकीनंतर विशेष बैठक घेऊन रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू; असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता.२६) करमाळा येथे बोलताना दिले. माढा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रचारसभा व माजी आमदार नारायण पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रमात श्री.पवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, माजी आमदार नारायण पाटील, अहिल्यादेवीचे वंशज भूषणसिंह होळकर, माळशिरसचे उत्तमराव जानकर, अभयसिंह जगताप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, मकाईचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे, माजी उपाध्यक्ष शहाजी देशमुख, सुभाष गुळवे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, अल्ताफशेठ तांबोळी, युवकचे शहराध्यक्ष अमीर तांबोळी, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर लावंड, प्रविण कटारिया, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ, धुळा कोकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादीचे शहर खजिनदार अरुण टांगडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रताप जगताप, उदयसिंह मोरे-पाटील, सवितादेवी राजेभोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.पवार म्हणाले, की करमाळा तालुका हा तसा दुष्काळी तालुका होता. १९७२ साली ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यामुळे करमाळ्याला माझे सारखे येणे-जाणे होते. स्व.नामदेवराव जगताप व स्व.शंकरराव मोहिते-पाटील, स्व. विठ्ठलराव शिंदे, स्व. औदुंबर पाटील या लोकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी काम केले. स्व. नामदेवराव जगताप यांचा याच मार्केट कमिटीत छोटासा बंगला होता. तेथूनच त्यांचा कारभार चालत असे; अशीही आठवण श्री. पवार यांनी सांगितली.
पुढे बोलताना श्री. पवार म्हणाले, की शेतीमालाच्या किंमती हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, तसा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. पण तो आज घेतला जात नाही. आजच्या पंतप्रधानांना या सर्व गोष्टींची आस्था नाही. एखाद्या हुकूमशाहीचे राज्य असावे असे ते राज्य करतात. सध्या जे राजकीय लोक मोदींवर टिका करतात ते त्यांना तुरूंगात टाकत आहेत. अशा पध्दतीने देशाचा कारभार चालू असून हुकूमशाही संपविण्यासाठी देशात परिवर्तनाची गरज आहे. म्हणून माढा मतदार संघातून धैर्यशील मोहिते-पाटील यांना आपण जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे. सुत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवराज जगताप यांनी मानले.
या कार्यक्रमानंतर श्री. पवार व विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. तेथे त्यांचे स्वागत श्री.जगताप यांनी केले. त्यांच्या या भेटीने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी रिटेवाडीसह तालुक्यातील वीज, उजनी पाण्याची समस्या, रेल्वे इ. विविध समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी श्री. पवार यांचेकडे मागणी केली. आदिनाथ कारखान्यासाठी शरद पवार व विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मदत केली होती. त्यामुळे हा कारखाना पुन्हा चांगला चालण्यासाठी तालुका आशेने तुमच्याकडे पाहत आहे. भविष्यात तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष व पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून तालुक्याचा विकास करण्यासाठी रात्रंदिवस काम करू.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, की आदिनाथ कारखान्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे शेतकरी हितासाठी प्रयत्न केले. परंतु यामध्ये तानाजी सावंत यांनी आडकाठी आणून आज या आदिनाथ कारखान्याची काय अवस्था करून ठेवली हे शेतकरी पाहत आहेत. नारायण पाटील यांचा कारखाना चालू व्हावा हा चांगला हेतू होता. परंतु चुकीच्या माणसाच्या नादी लागल्याने आदिनाथ चालू होवू शकला नाही. नारायण आबा यांचे पैलवानकीमध्ये मोठे नाव होते. ते आज खंबीरपणे पवार साहेबांबरोबर आहेत. मी आबांना एवढंच सांगेन तुम्ही आता योग्य तालीमत आहात. तुमचे वस्ताद पवार साहेब हे मोठे वस्ताद असून, ५० वर्षे या वस्तादाने भाजपाच्या विरोधात लढा दिला आहे. कितीही मोठी ताकद या वस्तादासमोर कमी पडलेली आहे. साहेबांनी अनेक पैलवान राजकीय दृष्टीकोनातून तयार केले. त्यातल्याच काही पैलवांना असे वाटले की, आता वस्तादाबरोबर आपण कुस्ती करूया. त्या पैलवानास मला सांगायचे.. साहेबांसारखा वस्ताद सोपा नसतो तो शेवटचा डाव राखून ठेवत असतो. असे सांगून ज्यांनी पक्षाशी व साहेबांशी गद्दारी केली अशा गद्दरांना या राजकीय कुस्तीत चितपट केल्याशिवाय रहायचे नाही; असा इशारा आमदार पवार यांनी दिला आहे.
यावेळी उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, की .. २१ मार्चला भाजपाने उमेदवारी नाकारली त्यावेळी लोकांनीच दादांना फोन करून काही झालेतरी निवडणूक लढवायची; असे सांगितले. त्यानंतर मी अनेक गावात दौरा केला त्या ठिकाणीही जुन्या मंडळींनी आठवणी सांगून व युवकांनीही अधिकारवाणीने काहीही झालेतरी निवडणूक लढवा अन्यथा पुन्हा तुम्ही आमच्याकडे यायचे नाही; असे हक्कांनी सांगत होते. त्यावेळेस ही निवडणूक आपल्या कुटूंबासाठी नाहीतर जनतेच्या हितासाठी व स्वाभिमानासाठी लढायची व त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागलीतरी चालेल; असा निर्णय घेतला. या देशात समतेचे व पुरोगामी विचाराचे काम करणारी एकच व्यक्ती पवार साहेब आहेत म्हणून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या राज्यात घराच्या मालकालाच तुझं घर नाही असं म्हणणारी माणसं निर्माण झाली आहेत. त्यामुळे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे आहे. यावेळी रिटेवाडी उपसासिंचन योजना तसेच मांगी तलावात कुकडीचे पाणी सोडणे, एमआयडीसीचा प्रश्न आदी समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू; असेही आश्वासन मोहिते-पाटील यांनी दिले.
यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे वैभवराजे जगताप, शाहूदादा फरतडे, माळशिरसचे उत्तमराव जानकर, भूषणसिंह होळकर, ॲड. सविता शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी नारायण पाटील गटाचे आजी-माजी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, ग्रा.पं.सदस्य, सोसायटीचे चेअरमन यांनी तसेच बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवराज जगताप यांनी मानले.