अल्प शिक्षण, अल्प शेती तरीही उत्तम प्रगती – ‘अमोल झिंजाडे’ची कौतुकास्पद झेप..
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.26: पोथरे गावात बालपण व प्राथमिक शिक्षण झालेले अमोल बाळासाहेब झिंजाडे हे जेमतेम नववीपर्यंत संगोबा हायस्कूलला गेले आणि त्यांनी शाळेला कायमचा रामराम ठोकला.
पुढं काय ..? हा प्रश्न होता. घरातील कोणी ना जास्त शिकलेले ना मार्गदर्शन करणारे. घरी शेती म्हटलीतर अवघी दीड एकर शेती. त्यात काय करणार ? पण अमोल यांनी स्वतःच निर्णय घेतला आणि सन 2009 ला ते कै. नानासाहेब सोमनाथ झिंजाडे यांचेकडे स्लाईडींग विंडोचे कामाला गेले.
सुरवातीला 12 वर्षे मजुरी केली. त्यानंतर नानासाहेबांनी त्यांची सचोटी ,कामाचे कौशल्य पाहून त्यांना सन 2019 मध्ये पार्टनर म्हणून घेतले. कामात गती घेतली. रात्रंदिवस काम सुरू होते, अन् कोरोनाचे संकट आले. त्यात अमोल स्वतः पाॅजीटीव्ह आले,नानासाहेबही पाॅजीटीव्ह आले. अमोल मांगी येथील कोव्हीड सेंटर मध्ये उपचार घेत होते तर नाना बार्शी येथील खासगी रूग्णांलयात दाखल होते. नानाचा अमोल ला फोन आला माझे काही खरे नाही, मी जगत नाही..हे ऐकले आंणि जीवाची पर्वा न करतो. अमोल यांनी मांगी सेंटर मधून पळ काढला व बार्शी गाठली. नानासाहेबांना धीर दिला. पण अखेर नानासाहेब गेले.
अमोल वर मोठी जबाबदारी पडली. नानासाहेबांच्या घरी शक्य तेवढी मदत केली.आता दुकानाचे काम पहाणे, हिशोब पहाणे व पुर्तता करणे ही कामे करत होते. गेल्या एक वर्षापासून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. उत्तम काम, योग्य दाम व परिपूर्ण सेवा यामुळे त्यांना ऑर्डरवर ऑडर येत होत्या. करमाळा तालुकाच नव्हे तर जामखेड, श्रीगोंदा व परांडा तालुक्यातही त्यांना ग्राहक आहेत.यातूनच त्यांनी प्रगती केली. आई-वडिलांसाठी शेतात बंगला बांधला. तर नुकतीच साडेबार लाख रूपये खर्चुन नवी एरटीका गाडी घेतली आहे.
या गाडी पुजनामुळेतर ही हकीकत समजली. अमोल यांनी केवळ कष्ट, जिद्द, चिकाटी व सातत्या या जोरावर मिळवलेला यश अप्रतिम आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत उभा रहाता येते हे अमोल झिंजाडे यांनी दाखवून दिले आहे.