‘यशकल्याणी’ सेवाभावी संस्थेचा ‘समाजरत्न’ पुरस्कार सुजित बागल यांना प्रदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते सुजिततात्या बागल यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल काल(दि.२६) यशकल्याणी सेवाभावी संस्थेचा ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रा.डॉ.संजय चौधरी तसेच ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महात्मा गांधी जयंती निमित्त गावातील ज्येष्ठ नागरिक यांना मायेचा आधार म्हणून काठी भेट देणे , दुष्काळामध्ये मोफत चारा छावणी, पाणीटंचाईच्या काळात स्वतःच्या टँकरने मोफत पिण्याचे पाणी वाटप ,गावातील निराधार गरजू वृद्ध व्यक्तींना दोन वेळचे मोफत अन्नदान , कोविड कालावधीत सॅनिटायझर व आर्सोनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप करणे असे अनेक सामाजिक उपक्रम सुजित तात्या बागल हे राबवत असतात. या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन त्यांना समाज रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मानपत्रामधील मजकूर…
समाजाची सेवा करताना ज्यांचे हात सरसावतात अशा माणुसकीच्या हातांना यश कल्याणी परिवाराकडून कृतज्ञतेचा नमस्कार. समाजसेवेच्या खडतर मार्गावर येऊन अनेकांनी त्यातील आपला खारीचा वाटा उचलावा, अन्य समाज घटकांना असे काम करण्याची प्रेरणा व्हावी, समाजसेवेचे ब्रीद अंगीकारावे यासाठी हे मानपत्र आहे .खरे तर हे कृतज्ञता पत्रच आहे. समाजाची सेवा अनंत हस्ते करावयाची असते. स्वयंस्फूर्तीने आत्म प्रेरणेने अन्य समाज घटकांच्या अडचणीत स्वतःला झोकून देऊन या ना त्या रूपात आपण समाजाची सेवा केली आहे. त्याबद्दल यश कल्याणी परिवार आपणा विषयी कृतज्ञतेचा भाव बाळगतो. शेती, माती, नाती, भक्ती, शक्ती आणि संस्कृती हीच खरी ओळख असलेल्या करमाळा तालुक्यात आपण करत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपल्याला सन्मानित करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या भावी सामाजिक वाटचालीसाठी व प्रकाशमान भविष्यासाठी आपल्याला ‘यशकल्याणी’ परिवाराकडून आभाळभर शुभेच्छा.