केम येथील सोनल कुलकर्णी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील ‘अॅबकस’ शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सोनल गौरव कुलकर्णी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र युवा फाउंडेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार येत्या २३ मे रोजी पुणे येथे सिनेअभिनेत्री पूजा राठोड, साराह मोतीवाल, डॉ. अविनाश सुकंडे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सरचिटणीस गणेश विटखर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
सोनल कुलकर्णी यांनी अॅबकस शिक्षण पद्धती प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी केवळ गणितातील कौशल्यच नव्हे, तर एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तांत्रिक क्षमतांमध्येही लक्षणीय प्रगती साधली आहे. ग्रामीण भागातील केम येथे त्यांनी सुरू केलेला अॅबकस क्लास आज पालकांमध्येही लोकप्रिय ठरला आहे आणि या शिक्षणपद्धतीची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. सोनल कुलकर्णी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







