करमाळा न्यायालयात काळ्या फिती लावून सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध

करमाळा : मुंबई येथे मंगळवारी झालेल्या राज्य न्यायाधीश संघटनेच्या बैठकीत भारताचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कामकाज सुरू असताना न्यायालयीन प्रशालेत झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या निषेधार्थ 08 ऑक्टोबर 2025 रोजी करमाळा न्यायालयात सर्व न्यायालयांच्या आस्थापनेतील विविध कर्मचारी न्यायालयीन कामकाजात कुठलाही व्यत्यय न आणता काळी फीत लावून कर्तव्य बजावले. या मार्गाने त्यांनी सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविला तसेच न्यायपालिकेच्या सन्मानासाठी आपली एकजूट प्रदर्शित केली.
यावेळी करमाळा वरिष्ठ न्यायालयाचे अधिक्षक तसेच कनिष्ठ न्यायालयाचे अधिक्षक शशिकांत कांबळे, सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष एस.एल. जाधव व सर्व क्लार्क व कर्मचारी उपस्थित होते. करमाळा न्यायालयातील सर्व क्लार्क व कर्मचारीवर्गाने यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने आपला निषेध नोंदवला. या निषेधाद्वारे त्यांनी न्यायालयीन व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्याचा आणि न्यायपालिकेच्या गौरवाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.





